`काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांच्या कामाचे श्रेय भाजपचे`
जे काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, तेच भाजपवाले काँग्रेसच्या मेट्रोचे श्रेय लाटण्याचे काम करत आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.
मुंबई : पालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार टीकास्त्र सुरु आहे. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहे. जे काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, तेच भाजपवाले काँग्रेसच्या मेट्रोचे श्रेय लाटण्याचे काम करत आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई पालिकेतील पारदर्शक कारभाराबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये कललीतुरा रंगला आहे. उद्धव यांनी केंद्राचे आभर मानत मुंबई देशात पारदर्शकते पहिली असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या सभेत शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्याला उद्धव ठाकरे कसं उत्तर दिले.
मेट्रोचा शोध भाजपने नाही लावला, मेट्रो काँग्रेसने आणली.मुंबईत शाळा आणि हॉस्पिटल महापालिकेने बांधली, सरकारने नाही. मुख्यमंत्री मुंबईबद्दल बोलतात मात्र, नागपूरबद्दल का बोलत नाहीत? मुंबईत कामं करत असताना भाजप गप्प बसली, हीच मोठी मदत. आमचं एकतरी काम खोडून दाखवा, हे माझं मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना आव्हान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.
कल्याण-डोंबिवलीला मुख्यमंत्री साडेसहा हजार कोटी रुपये देणार होते, अजून एक पैसाही दिला नाही. कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले गेलेत. केंद्राच्या अहवालातील यादीत फडणवीसांचं नागपूर कुठेही दिसत नाही. आम्ही समोर वार करतो, पाठीत वार करण्याची औलाद आमची नाही. मोदी रोज नव्या देशात असतात, म्हणून त्यांना वाटतं ‘देश बदल रहा है’, असा टोला उद्धव यांनी हाणला.
पाटणा शहराशी मुंबईची तुलना म्हणजे मुंबईकरांचा अपमान आहे. मुंबईचं आम्ही पाटणा केला असेल, तर तुम्ही दोन वर्षे तंबाखू चोळत बसला होतात का? पातळी नसलेल्या माणसाशी आमची लढत असल्याची लाज वाटायला लागली आहे. अहवाल केंद्राचा आहे, मुख्यमंत्री तुम्ही कशाला खोटं बोलत आहात? केंद्राच्या अहवालावर विश्वास नसेल, तर केंद्रात तुमची गाढवं बसलीयेत का? पारदर्शक कारभारात ‘मुंबई नंबर वन’. फडणवीस हे ‘उपरवाल्याच्या मर्जी’वाले आहेत. शिवसेनेवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा घसाच बसला होता, आता घसा जरा उठलाय. भाजपने ‘पारदर्शक’ राम मंदिर बांधलंय, कुणालाच दिसत नाही, अशी बोचरी टीका केली.