मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम याने आर्थर रोड तुरुंगातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे तेथील डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आमदार रमेश कदमला यानंतर अंडासेलमध्ये टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. आमदार कदम याच्या विरोधात एन. एम. जोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आमदार रमेश कदम हा अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी आहेत.


रमेश कदम  ऑगस्ट २०१५ पासून ऑर्थर रोड तुरुंगात होता. मुत्राशयाच्या आजारावर उपचार सुरू आहेत. त्यासाठी बुधवारी दुपारी एक वाजता त्यांना पोलिस संरक्षणात जे. जे. रुग्णलयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार होते. त्याचवेळेस तुरुंगाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तुरुंग अधीक्षकांच्या दालनात बैठक सुरू होती. 


आमदार कदम संतापाच्या भरात अधीक्षकांच्या दालनात शिरला आणि त्यांनी‌ मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिविगाळ करण्यास सुरवात केली. जे. जे. रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारांना नेण्यासाठी पोलिस संरक्षण उपलब्ध झाले नाही, म्हणून आमदार कदमचा राग अनावर झाला. त्यांने 'तू बाहेर भेट, तुझी वाट लावून टाकतो,' अशी धमकी डॉक्टरांना दिली. 


या प्रकारामुळे तुरुंग अधीक्षकांच्या दालनात उपस्थित असलेल्या डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एन. एम. जोशी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्यामध्ये संपूर्ण घटनाक्रम नमूद केला असून आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 


कदम यांना बारा क्रमांकाच्या विशेष सुरक्षा विभागात ठेवले होते. पण या घटनेनंतर त्यांना अंडासेलमध्ये हलवण्यात आल्याचे समजते.