एहेसान अब्बास झी मीडिया मुंबई : छटपूजेवरुन मुंबईत राजकारणाला सुरुवात झालीये.. आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता उत्तर भारतियांच्या मतांसाठी भाजपनं छटपुजेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय.. काँग्रेसही छटपुजेच्या माध्यमातून आपली वोटबँक अधिक मजबूत करु पहातीये तर छटपूजेवरुन राजकारण होणार असेल तर विरोध करु अशी भूमीका मनसेनं घेतलीये.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छटपुजेच्यावेळी मुंबईचे सर्वच किनारे भाविकांनी फुलुन जातात... पूजा अर्चा आणि सूर्याला अर्ध्य अर्पण करण्यासाठी दूरवरुन भावीक इथं येतात.. यात उत्तर भारतियांची संख्या मोठी असते.. त्यामुळे या हक्काच्या वोट बँकेला खूष करण्यासाठी राजकीय पक्ष मागे कसे रहातील..?? छटपूजेच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीयांना खूश करण्यासाठी यावेळी भाजपनं हालचाली सुरू केल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः छटपूजेत सहभागी होणार आहेत. कुलाबा, दादर शिवाजी पार्क, आणि इतर अशा एकंदर 12 समुद्रकिना-यांच्या ठिकाणी भाजपनं छटपूजा आयोजित करायचं ठरवलंय, असे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. 



मुंबईतील उत्तर भारतीय म्हणजे काँग्रेसची हक्काची वोट बँक त्यामुळे या वोटबँकेवर आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी काँग्रेसही प्रयत्नशील आहे.. दरवर्षीप्रमाणं यंदाही संजय निरुपम यांनी छटपूजेसाठी जूहू चौपाटीवर रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन केलंय, छठ पूजा आम्ही पूर्वीपासून करत आहोत, पण आता हे लोक राजकारण करत आहेत असे, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटले आहे. 


देशभरात यंदा 6 नोव्हेंबरला सूर्यास्त आणि 7 नोव्हेंबरला सुर्योदयाच्यावेळी सूर्याला अर्ध्य देऊन छटपूजा साजरी केली जाणार आहे. छटपूजेच्या निमित्तानं मुंबईत काँग्रेस आणि भाजप आपली राजकीय ताकद दाखवू पहाते तर दुसरीकडे शिवसेना आणि मनसेनं मात्र सणाचं राजकारण होत असल्याचा आरोप केलाय..



मुंबईत उत्तर भारतिय मतदारांची संख्या 16 ते 20 टक्के आहे.. त्यामुळे महापालिकेवर पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी सेना-भाजपनं कंबर कसलीये.. तर दुसरीकडे हक्काची वोटबँक हातची जाऊ नये म्हणून काँग्रेसनंही कंबर कसलीये..