पैसा जिंकला, काम हरलं - राज ठाकरे
`पैसा जिंकला, काम हरलं`, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं.
मुंबई : निवडणुकीचा निकाल आला, तेव्हा माझ्या मनातली पहिली प्रतिक्रिया होती, 'पैसा जिंकला, काम हरलं', असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं. मनसेच्या अकराव्या वर्धापनदिना निमित्ताने बोलताना राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.
नाशिकमधील मनसेच्या पराभवावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार, ज्यांनी नाही मतदान केलं त्यांचेही आभार कारण त्यांनी शिकवलं , काम करून मतं मिळत नाहीत, आणि ज्यामुळे मतदान केलं जातं, याचा पुरवठा यापुढे करण्यात येईल, असंही यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं.
आम्ही काम केलं हे सर्वात मोठी चूक केली, कामं करून निवडणुका जिंकता येत नाहीत, काम करून मतं मिळतात, असं निवडणुकांमधून दिसत नाही, असंही राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितलं. नाशिकमध्ये ज्या पक्षाकडे माणसं नव्हती ते जिंकले, आणि जे राबराब राबले, अडी अडचणीला धावून आले, त्यांना पराभव पत्करावा लागला. यापुढे मी आणि पक्षाचे नेते कार्यकर्त्यांच्या भेटीला जाऊ असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.