मुंबईत अनेक ठिकाणी कोरडी होळी
राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक ठिकाणी कोरडी होळी साजरी करण्यात येणार आहे.
मुंबई : राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक ठिकाणी कोरडी होळी साजरी करण्यात येणार आहे.
रंगपंचमीच्या तयारीसाठी याठिकाणी फुलांची खरेदी केली जातेय. आता तुम्ही म्हणाल रंगपंचमीला फुलांची काय आवश्यकता? तर मुंबईतल्या सहा ईमारतीमधील दोन हजारहून अधिक रहिवाश्यांनी यंदा फुलांची होळी साजरी करायचं ठरवलं आहे.
रंगीबेरंगी रंग आणि पाण्याऐवजी यंदा बीआयटी चाळीत रंगपंचमी साजरी होणाराय ती कलरफुल फुलांची. सामाजिक भान राखत, तिथल्या रहिवाशांनी हा निर्णय घेतलाय. रंगपंचमीला फुलांची कमतरता भासू नये, यासाठी झेंडू, गुलाब, मोगरा अशा चाळीस किलो फुलांची ऑर्डर देण्यात आलीय. शहरी लोकांनाही पाण्याची किंमत कळावी, यासाठी हा प्रयत्न असल्याचं रहिवाशांनी सांगितलंय.
सांताक्रूझमधील कल्पना सोसायटीतील रहिवाशांनीही पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बच्चे कंपनीला मनवलंय. लहान मुलांना दुष्काळ, पाणीटंचाई हे सगळं समजावून सांगणं थोडं अवघड होतं. त्यामुळं पाण्याशिवाय होळी खेळली तर सगळ्या मुलांना आईस्क्रीम बक्षीस दिलं जाणार आहे.