मुंबईवरील हल्ल्याला आठ वर्ष, शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबईवरील हल्ल्याला आठ वर्ष झाली आहेत. या हल्ल्यात 166 निष्पापांचा मृत्यू झाला होता. तर तीनशेहून अधिक नागरिक जखमी झाले होते. यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता.
मुंबई : मुंबईवरील हल्ल्याला आठ वर्ष झाली आहेत. या हल्ल्यात 166 निष्पापांचा मृत्यू झाला होता. तर तीनशेहून अधिक नागरिक जखमी झाले होते. यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता.
पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईला तब्बल 60 तास वेठीस धरले होते. या हल्ल्यात मुंबई पोलीस दलाचेही मोठं नुकसान झालं. पोलीस दलातील 14 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहिद झाले होते. मात्र याआधी त्यांनी आपलं कर्तव्य निष्ठेने बजावत प्राणाची बाजी लावत 8 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
तर तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या निधड्या छातीच्या आणि शूर पोलीसामुळे भारताला पाकिस्तानविरोधातला सगळ्यात मोठा जिवंत पुरावा म्हणजेच दहशतवादी कसाब हाती लागला होता. तुकाराम ओंबळे, हेमंत करकरे, विजय साळस्कर, अशोक कामटे, कॅप्टन संदीप उन्नीकृष्णन यांनी मुंबई आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. या सगळ्या वीरांच्या बलिदानाचं सारा देश स्मरण करतोय. झी 24 तासकडूनही या हल्ल्यातील मृतांना आणि शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली.