मुंबई : एखादं चिमुरडं रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडलं तर तुम्ही काय कराल...? माणुसकी शिल्लक असलेली कोणतीही व्यक्ती या चिमुरड्याला उचलून घेऊन जाईल... असंच विरारमध्ये राहणाऱ्या निमेश भन्साली या एका व्यावसायिकानंही केलं... पण, याचमुळे आज त्यांच्या डोळ्यांत अश्रू दिसत आहेत.


नाल्याजवळ आढळलं चिमुरडं.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नायगावच्या नाल्याजवळ गेल्या आठवड्यात एक चिमुरडं एका फडक्यात गुंडाळून चिखलामध्ये फेकलेल्या अवस्थेत निमेश यांना दिसलं. मुंग्यांनी चावा घेतलेला या बाळाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. तिथं अनेक लोकांनी या बाळाला पाहिलं... पण निमेश यांनी पुढाकार घेत या बाळाला उचलून त्याला हॉस्पीटलमध्ये दाखल केलं. योग्य ते उपचार या बाळाला दिले. या बाळाला काल हॉस्पीटलमधून डिस्चार्ज मिळाला. 


न्यायाधिशांनी मारली दांडी... 


आता या बाळाचं भवितव्य कोर्ट ठरवणार आहे. त्यामुळे भविंडी कोर्टात भन्साली दाम्पत्य या बाळाला घेऊन आलं. पण, न्यायाधिशांनीच दांडी मारली. त्यामुळे पुढचा निर्णय येईपर्यंत या बाळाला डोंबिवलीच्या जनानी चॅरिटेबल ट्रस्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. 


...बाळाला पाहताही आलं नाही


धक्कादायक म्हणजे, ज्या बाळानं आपल्याला गेल्या आठवड्याभरात लळा लावलाय त्या बाळाला आज आपल्याला पाहताही येत नाहीय, असं भरलेल्या डोळ्यांनी भन्साली यांनी म्हटलंय. कायद्यानुसार, इच्छा नसतानाही भन्साली दाम्पत्याला या बाळाला आपल्या हातांनी ट्रस्टकडे सोपवावं लागलं. मात्र, यानंतर ट्रस्टनं बाळाला ताब्यात घेतल्यानंतर भन्साली दाम्पत्याला एकदाही या बाळाला पाहण्याची परवानगी दिली नाही.