मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जेलमध्ये सुरू असलेल्या कैद्यांच्या मनमानीच्या बातम्या बाहेर येत आहेत. कर्मचाऱ्यांना पैसे मोजले की मोबाईलपासून वाट्टेल ते जेलमध्ये मिळतंय. पण 1993च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींवर जरा विशेष मर्जी आहे. कारण मुस्तफा डोसाने एक आख्खी रात्र आपल्या पत्नीसोबत ट्रेनच्या डब्यात घालवल्याचं समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अबू सालेम, मुस्तफासारख्या अतिरेकी कारवायांमध्ये गुंतलेल्यांना दिली जाणारी ही शाही वागणूक संतापजनक आहे. बॉम्बस्फोटातले आरोपी करतात ऐश, कुटुंबीयांसोबत प्रवासाचीही मुभा मिळत आहे.अबू सालेमनंतर आता मुस्तफा डोसाला पोलिसांकडून चांगली वागणूक मिळत असल्याने आश्चर्य़ व्यक्त होत आहे.


आपल्या बायकोसोबत प्रवासाला निघालेला हा  माणूस आहे 1993च्या बॉम्बस्फोटातला आरोपी मुस्तफा डोसा. मॉडेल असलेल्या आपल्या पत्नीसोबत त्यानं आख्खी रात्र एका ट्रेनमध्ये काढली... मीड डे या टॅब्लॉईडनं हे फोटो प्रकाशित केलेत.


25 डिसेंबरला मुस्तफाला गुजरातमध्ये पोरबंदरला कोर्टाच्या तारखेसाठी घेवून जाण्यात येत होतं. सौराष्ट्र एक्सप्रेसनं सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी मुंबई सेंट्रल इथून एस ३ या बोगीतून त्याला नेण्यात आलं. रात्री ८ वाजता अहमदाबादला डब्यात त्याची पत्नी शबाना खत्री चढली. शबाना गाडीत आल्यावर मुस्तफाच्या बंदोबस्तासाठी असलेले सर्व आठ पोलीस शिपाई डब्यातल्या शैचालयाजवळ उभे राहिले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे साडेपाच पर्यंत शबाना आणि मुस्तफा गाडीत सोबत होते.


 अबू सालेमचीही अशीच शाही बडदास्त 


यापूर्वीही बॉम्बस्फोटाचा आरोपी अबू सालेमचीही अशीच शाही बडदास्त ठेवली जात असल्याचं समोर आलं होतं.  २०१३ साली अबू सालेमनं एका वकील महिलेसोबत पुर्ण दिवस घालवला होता
२०१४ साली अबूची तळोजा जेलमधली चिकन पार्टी गाजली होती. त्याच वर्षी अबूनं मुंब्र्यातल्या एका मुलीसोबत रेल्वेत लग्न केलं तर २०१५मध्ये मुस्तफा डोसानं कोर्टाच्या आवारातच एका मॉडेलची स्क्रिन टेस्ट घेतली होती.



अंडरवर्ल्ड डॉन मुस्तफा काय आणि अबू सालेम हे आपल्या मर्जीनं कधीही कोणालाही भेटतात. जेलमधून गॅंग चालवतात. तळोजा जेल म्हणजे अबू सालेमचे साम्राज्य तर आर्थररोड जेल म्हणजे मुस्तफा डोसाची जहांगीरी चालते. त्यांच्या सांगण्यावरुन तुम्हाला कोणतीही वस्तू जेलमध्ये मिळू शकते, हे अनेकदा सिद्ध झालंय. चिरीमिरीसाठी काहीही करायला तयार असलेले जेलचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानं हे चालतं, हे आता पुढे येत आहे.