दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या 84 आणि भाजपाच्या 82 जागा निवडून आल्याने मुंबईत कुणाचा महापौर होणार याबाबत उत्सुकता आहे. अपक्ष आणि इतर नगरसेवकांना आपल्याबरोबर घेण्याचा दोन्ही पक्षांनी प्रयत्न सुरू केला असला तरी आता मुंबईत शिवसेनेबरोबर पॅचअप करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांशी गुप्त चर्चा सुरू केली असल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांकडून मिळाली आहे. 


मुंबईत एकत्र येण्यासाठी कुणी प्रस्ताव द्यायचा यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा इगो आड येतोय. एकतर निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवरजहरी टीका केल्याने दोन्ही पक्षांचे नेते दुखावले गेले आहेत.  त्यामुळे मुंबईत पुन्हा एकत्र येण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चर्चेला सुरुवातच होऊ शकलेली नाही. तरीही भाजपाने मुंबईत शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्यासाठी पॅच करण्याचा निर्णय घेतला आहे. 


त्यासाठी ते शिवसेनेच्या काही नेत्यांबरोबर गुप्त चर्चा करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत निरोप पोहचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 
शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडू नये याबरोबरच राज्यातील कोल्हापूर, सांगली, नाशिक, जालना, औरंगाबाद, हिंगोली, बुलढाणा आणि यवतमाळ या 8 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला शिवसेनेची गरज पडणार आहे. त्यामुळे या बाबी लक्षात घेऊनच भाजपाने मुंबईबाबत गुप्त चर्चा सुरू केली असल्याची माहिती आहे.


 



दहा महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांचे निकाल लागल्यानंतरच जिथे गरज असेल तिथे भाजपा-शिवसेनेने पुन्हा युती करावी अशी वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यातील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवरही भाजपाने आता शिवसेनेबरोबर एवढा संघर्ष होऊनही पॅचअप करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.