मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने महागाई कमी होईल असे म्हटले होते. मात्र, पेट्रोल दरवाढीचा दणका मिळाल्यानंतर आता राज्य सरकार सामान्यांच्या एसटीची दरवाढ १ एप्रिलपासून करीत आहेत. त्यामुळे एसटीचे भाडेवाढीने प्रवाशांचा खिसा खाली होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटीची तिकिटे १ एप्रिलपासून सरसकट एक रुपयाने महागणार आहेत. एसटी प्रवासावर अपघात सहायता निधी योजनेद्वारे एक रुपयाचा अधिभार लावण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार असल्याने या दिवसापासून सर्व तिकिटे एक रुपयाने महागणार असल्याचे एसटी महामंडळातील खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले. 


एसटी बस अपघातांत मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयाना आणि जखमी प्रवाशांना महामंडळाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मृत प्रवाशाच्या वारसाला तीन लाख रुपये तर जखमी प्रवाशाला ३० हजार ते ७५ हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाते. त्यात वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.


एसटीकडून आता मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाच्या वारसाला १० लाख रुपये देण्याची योजना आहे. त्यासाठी तिकिटांवर अधिभार लावून वाढीव निधी जमा करण्याची योजना आहे. त्यादृष्टीने १ एप्रिलपासून सरसकट सर्व बसमार्गांवरील तिकिटांवर एक रुपया अधिभार लावण्याचे महामंडळाने ठरवले आहे.  यातून एसटी महामंडळाकडे वर्षाला सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी जमा होईल.