काँग्रेसकडून नारायण राणेंचं पुनर्वसन
काँग्रेस पक्षानं नारायण राणेंचं पुनर्वसन करायचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : काँग्रेस पक्षानं नारायण राणेंचं पुनर्वसन करायचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे राज्याचे दिग्गज आणि आक्रमक नेते नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे विधिमंडळामध्ये आता पुन्हा नारायण राणेंची तोफ धडाडणार आहे.
याआधी विधानसभा निवडणूक आणि वांद्रे पश्चिमच्या विधानसभा पोटनिवडणूक या दोन्हीवेळा नारायण राणेंना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आता नारायण राणेंना काँग्रेसनं विधान परिषद निवडणुकांच्या मैदानात उतरवंल आहे.
या निवडणुकीत काँग्रेसनं राष्ट्रवादीला दोन जागा दिल्यात. राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आणि रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेसाठी उमेदवार असतील. दरम्यान भाजपनं अजून पर्यंत आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मात्र ज्या जिल्ह्यात भाजपचा आमदार नाही, अशा जिल्ह्यातल्या नेत्याला विधान परिषदेवर पाठवून त्या जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.
त्यामुळे भाजपकडून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सुरजितसिंह ठाकूर आणि सिंधुदुर्गातील माधव भंडारी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर तीन जागा भाजपाकडून मित्रपक्षांना सोडल्या जाणार आहेत. यात विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांच्या नावाची चर्चा आहे.