राज्य सरकारचा होणार विस्तार; शिवसेनेला कॅबिनेट, मित्रपक्षांना संधी?
बरेच दिवस रिंगाळलेला राज्य सरकारचा विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी सेनेचे वर्चस्व असलेल्या काही ठिकाणी भाजप आमदारांना मंत्रीपद बहाल करण्यात येण्याची शक्यता आहे.
मुंबई : बरेच दिवस रिंगाळलेला राज्य सरकारचा विस्तार होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने शिवसेनेला शह देण्यासाठी सेनेचे वर्चस्व असलेल्या काही ठिकाणी भाजप आमदारांना मंत्रीपद बहाल करण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचवेळी भाजप मित्र पक्ष खूप नाराज असल्याने त्यांनाही संधी देण्यासाठी विस्तार करण्याचे बोलले जात आहे. पुढील आठवड्यात हा विस्तार होणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे म्हटले जात आहे. या विस्तारात शिवसेनेला एकच कॅबिनेट खाते देण्याचा घाट आहे. जळगावमधील शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट खाते मिळण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. मात्र, ठाण्यात भाजपला जम बसविण्यासाठी आणि सेनेच्या किल्ल्यात शिरकाव करण्यासाठी भाजपच्या कोट्यातून संजय केळकर यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता अधिक आहे.
नाराज मित्रमंडळींना भाजप सत्तेत वाटा देण्याची शक्यता आहे. मित्रपक्षातील महादेव जानकर, सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे यांना राज्यमंत्रीपद मिळतील अशी शक्यता आहे. भाजपला मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. त्यासाठीच हा विस्तार असल्याचे बोलले जात आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून सुरू झाले. अधिवेशन १३ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात अधिवेशन संपण्यापूर्वी एक-दोन दिवस आधी किंवा नंतर भाजप सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार विचार करीत आहे.
भाजपची नवी चाल
ठाणे शहरात भाजपला चेहरा नाही. मुंबईसह ठाण्यात शिवसेनेशी काडीमोड करून भाजप स्वबळावर निवडणूका लढविण्याचा विचार करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यातून भाजप प्रत्येकी एक-एक मंत्रिपद देण्याच्या विचारात आहे.ठाणेतून संजय केळकर तर मुंबईतून आशिष शेलार अथवा मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
सांगलीतून खाडे, विदर्भातून संजय कुटे यांच्या नावाचा विचार सुरु असताना काही मंत्र्यांची खाती बदलण्याच्या विचारात मुख्यमंत्री आहेत. राज्यमंत्री राम शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले जाऊ शकते तर काहींकडील भार कमी केला जाऊ शकतो.
खडसेना लगाम लावण्यासाठी...
जळगावमधील शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मिळण्याची शक्यता आहे. गुलाबराव पाटील एकनाथ खडसे यांचे विरोधक मानले जातात. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस पाटील यांना संधी देतील अशी अटकळ आहे.