मुंबई : आता मुंबईकरांच्या डोक्यावरून पाणी गेले आहे. गेली 25 वर्षे मुंबईकरांना खड्ड्यात घालणाऱया सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱयांना पालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवून  खड्ड्यात पुरण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केला. निमित्त होते ’मुंबईत खड्डे की खड्ड्यांची मुंबई’ या आगळ्यावेगळ्या चित्रप्रदर्शनाचे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन आठवड्यात पडलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. रस्तेदुरुस्तीच्या नावाखाली शेकडो कोटींची कंत्राटे घशात घालणाऱया सत्ताधाऱयांचे पितळ पावसानेच उघडे पाडले. मुंबईत ठिकठिकाणच्या रस्त्यात पडलेल्या हजारो खड्ड्यातून मार्ग काढताना मुंबईकरांचा जीव कंठाशी आला असताना मुंबईत अवघे 66खड्डे असल्याचा दावा करणारे पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीला या चित्रप्रदर्शनातून आमदार नितेश राणे यांनी तोंडघशी पाडले आहे.


मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी “मुंबईत खड्डे की खड्ड्यांची मुंबई’ या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या हस्ते झाले. या चित्रप्रदर्शनाला माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्यासह मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा आदी मान्यवर उपस्थित होते. 


महापालिकेच्या खड्ड्यांच्या भ्रष्टाचारात मात्र छोट्या माशांना अडकवले जात आहे. मोठे मासे मात्र मोकाटपणे आणखी खड्डे पाडताहेत. याचा जाब सत्ताधारी देतील अथवा नाही, हे माहित नाही. मात्र या सत्ताधाऱयांना मुंबईकर खड्ड्यात गाडल्याशिवाय राहणार नाहीत, असा घणाघाती हल्ला नितेश राणे यांनी चढवला.