मुंबई : डिसेंबर सुरू झाल्यानंतरच वेध लागतात ते ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशन पार्टीचे... पण यावर्षी माहोल थोडा ठंडा पडलाय... कारण नोटाबंदी... कुणाच्याच खिशात नोटा नसल्यानं पार्टी करायची तरी कशी, याचं टेन्शन सगळ्यांना आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गारेगार थंडी, वर्षाचा शेवटचा महिना आणि ख्रिसमस-न्यू इयरचं सेलिब्रेशन... डिसेंबर उजाडत नाही तोच सुरू होतात ते पार्टीचे प्लान... यंदाचा थर्टी फर्स्ट कसा आणि कुठं सेलिब्रेट करायचा, याचं प्लानिंग सुरू होतं. शॉपिंग, हॉटेलिंग, टूर असे बेत आखले जातात. 


पण डिसेंबरचा दुसरा आठवडा उजाडला तरी माहौल थंडावलाय... कारण नोटाबंदी.. रोख रकमेसाठी ग्राहक सध्या उभे आहेत ते एटीएमबाहेरच्या रांगेत. त्यामुळं पार्टीचा मूडच ऑफ झालाय... परिणामी इयर एन्डिंगसाठीची हॉटेल बुकींग्ज 30 ते 40 टक्क्यांनी घटलीत.


खिशात रोख रक्कमच नसेल तर बाहेरगावी फिरायचं तरी कसं, असा प्रश्न पर्यटकांना पडलाय. अनेकांनी तर आधी केलेलं बुकिंगही रद्द करायला सुरूवात केलीय.


केवळ फिरायला जाण्यावरच नाही, तर शॉपिंगवरही गदा आलीय. लोकांच्या शॉपिंगच्या उत्साहात विरजण घालतेय ती 2000 रूपयांची गुलाबी नोट... शॉपिंग तर करायचीय. पण 2000 रूपयांचे सुट्टे कोण देणार, हा प्रश्न आडवा येतोय.


नववर्षाचं स्वागत करायचं तर केवळ मनात इच्छा असून भागत नाही. खिशात करकरीत नोटाही लागतात. पण इथंच घोडं पेंड खातंय. आता न्यू इयरच्या शुभेच्छा एटीएमच्या लायनीत देण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, म्हणजे मिळवली.