तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात घुसणार, दर्ग्याबाहेर कडेकोट बंदोबस्त
शनिमंदिर प्रवेश आंदोलन यशस्वी झाल्यानंतर भूमाता महिला ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई अधिक आक्रमक झाल्यात. मुंबईतील हाजी अली दर्ग्यात धडक देणार आहेत.
मुंबई : शनिमंदिर प्रवेश आंदोलन यशस्वी झाल्यानंतर भूमाता महिला ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई अधिक आक्रमक झाल्यात. कोल्हापूरमधील आंदोलनानंतर आता मुंबईतील हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश देण्यासाठी आंदोलन करणार आहेत. आज चार वाजता मुंबईतील हाजी अली दर्ग्यात धडक देणार आहेत. दरम्यान, दर्ग्याबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
रस्त्यावर बॅरिकेड्स
हाजी अली दर्ग्यात पुरुषांप्रमाणेच महिलांना प्रवेश मिळावा आणि त्यांना दर्शन घेता यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाला एमआयएमने विरोध केला आहे. आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दिलाय. तर आज सकाळपासून दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावली आहेत.
आरएसएसमध्ये महिलांना संधी द्या
दरम्यान, तृप्ती देसाई यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना एक पत्र लिहून संघात महिलांनाही संधी देण्याची मागणी केली आहे. तसेच या पत्रात आपल्याला भेटण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती केली आहे.
खान मंडळींनी भूमिका मांडावी
तर दुसरीकडे अभिनेते शाहरूख खान, सलमान खानसह अमिर खान यांनी महिलांना प्रवेश देण्याबाबत आपली भूमिका जाहीर करावी, असे आवाहन केले आहे.