मुंबई : देशात सध्या चलनाचा तुटवडा दिसून येत आहे. चलन काढण्यावर निर्बंध असल्याने अनेकांना एटीएम आणि बॅंक, पोस्टासमोर रांगा लावाव्या लागत आहे. देशात तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून आणखी एका महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. यात दुकाने आणि मॉल्सच्या स्वाईप मशिन्समधून पैसे काढता येणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयच्या या निर्णयामुळे देशभरातील दुकाने आणि मॉल्सच्या स्वाईप मशिन्समधूनही नागरिकांना पैसे काढता येणार आहेत. यासाठी 2000 रूपयांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. येत्या 30 डिसेंबरपर्यंत स्वाईप मशिन्समधून पैसे काढण्यावर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले. 


आरबीआयने जरी याची घोषणा केली तरी सध्या 2000 रुपयांची नोट घेऊन गेले असता किरकोळ साहित्य देण्यास दुकानदार नकार देतात. त्यामुळे आता दुकानधारक आणि मॉल्स आरबीआयच्या आदेशाला कशाप्रकारे प्रतिसाद देतात, याकडे लक्ष आहे.


यापूर्वी सरकारने पेट्रोल पंपावरूनही पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. दरम्यान, आज, शनिवारी देशभरातील सर्व बँकांमध्ये नोटबदलाचे काम बंद होते. नोटबदलासाठी नागरिकांना दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. मात्र, या निर्णयाला ज्येष्ठ नागरिक अपवाद होते.