मुंबई :  केंद्र सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या को-या नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र छापले आहे. त्याचे स्वागत करताना एक हजार रुपयांच्या नव्या नोटांवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र छापण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाने केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी चलनातून बाद केलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र होते. त्यानंतर चलनात नव्याने दाखल झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे. दरम्यान, चलनातून बाद केलेली एक हजार रुपयांची नोट नव्या रुपात छापण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. मात्र या नव्या नोटेवर बाबासाहेबांचे छायाचित्र छापण्याची मागणी खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.


खरात म्हणाले की, नुकतीच बाबासाहेबांची १२५ वी जयंती देशासह जगभरात साजरी करण्यात आली. जगभर बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव होत असताना देशात मात्र बाबासाहेबांना मार्गावरील नावापुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता तरी त्यांच्या कार्याची परतफेड करण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एक हजार रुपयांच्या नोटेवर बाबासाहेबांचे छायाचित्र छापण्याचा ठराव मंजूर करून केंद्राला पाठवण्याचे आवाहन खरात यांनी केले आहे.