दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसला बसलेल्या फटक्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमधील सुप्त संघर्ष टोकाला पोहचण्याची शक्यता आहे. यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या टार्गेटवर आहेत. आता तर त्यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवावे यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढतो आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
राज्यातील पहिल्या टप्प्यातील 147 नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने पक्षातील अस्वस्थता वाढीस लागली आहे. या निकालानंतर पक्षातील जेष्ठ नेत्यांची नाराजी उघडपणे उफाळून आली. यात पहिला बॉम्ब टाकला तो बाळासाहेब थोरात यांनी... थोरातांनी थेट राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर निशाणा साधला. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या कामगिरीवरच थोरात यांनी बोट ठेवले.



बाळासाहेब थोरात यांच्यानंतर पक्षातील इतर नेतेही विखे-पाटलांबाबत नाराजी व्यक्त करू लागले. यापूर्वी नारायण राणेंनी विखे-पाटलांच्या विधानसभेतील कामगिरीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं होतं. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची कामगिरी अगदीच सुमार होती. याला काँग्रेसमधील नेते विखे-पाटील यांना जबाबदार धरत आहेत. या अधिवेशनात विरोधी पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता. विखे-पाटील यांच्या काँग्रेसमधील नेते आणि आमदारांमध्येही या अधिवेशनात समन्वय दिसला नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह पक्षाच्या काही आमदारांनी याबाबत अधिवेशन काळात अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभेत कोणते मुद्दे चर्चेला घ्यावे यावरूनही पक्षांतर्गत मतभेद यावेळी दिसून आले. आता नगरपालिकेच्या तिसऱ्या टप्प्यातील निकालानंतर पुन्हा एकदा ही नाराजी समोर आली आहे. औरंगाबादचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून विखे-पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.



 राज्यात भाजपाविरोधात वातावरण असतानाही सरकारविरोधात वातावरण निर्मिती करायला काँग्रेस कमी पडत असल्याचा दावा काँग्रेसच्या आमदारांचा खाजगीत करतात. याला कमजोर विरोधी पक्षनेता जबाबदार असल्याचेही हे आमदार सांगतात. त्यामुळे आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते बदलण्याचा दबाव काँग्रेस अंतर्गत वाढत आहे.