राज ठाकरेंनी घेतली जखमी पोलिसाच्या कुटुंबीयांची भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात जाउन वांद्रे पोलीस ठाण्याचे हवालदार विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलीय.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लीलावती रुग्णालयात जाउन वांद्रे पोलीस ठाण्याचे हवालदार विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतलीय.
२३ ऑगस्ट रोजी खार एस.व्ही.रोड वर कर्तव्य बजावत असताना शिंदे यांच्यावर बाइक स्वारांनी हल्ला केला होता. आज राज ठाकरेंनी शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शिंदे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
काय घडलं होतं नेमकं...
एका बाईकस्वारानं हेल्मेट घातलेलं नसताना शिंदे यांनी त्याला थांबवलं... त्यानंतर त्याच्याकडे लायसन्स आणि बाईकचे पेपरही नसल्याचंही त्यांच्या लक्षात आलं.
पोलिसांनी हटकल्यानं या बाईकस्वारानं फोन करून आपल्या भावाला बोलावून घेतलं... थोड्याच वेळात तिथं दाखल झालेल्या त्याच्या भावानं मागून येऊन अचानक विलास शिंदे यांच्या डोक्यात बांबूनं हल्ला केला.
शिंदेंची प्रकृती चिंताजनक
विलास शिंदे यांच्यावर ड्युटीवर असताना झालेला हा हल्ला त्यांच्या जीवावर बेतलाय. लिलावती हॉस्पीटलमध्ये ते मृत्यूशी झुंज देत आहेत.
परंतु, विलास शिंदे यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणत्याही मंत्र्यांनं साधी विचारपुसही केलेली नाही. याबद्दल राज ठाकरेंनी जाहीर भाषणात नाराजीही व्यक्त केलीय.