मुंबई : आमच्या मुलांनी तीन वर्ष अभ्यास केलाय. वर्षाला लाखभर रुपये खर्च आलाय. आता केंद्र सरकारने  'नीट'चा घोळ घातलाय. आम्ही करायचं काय, विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय, असे गाऱ्हाने मांडणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे न्याय मिळाल्याने कृष्णकुंजवर आज जल्लोष पाहायला मिळाला. 


शेकडो विद्यार्थी 'राज' दरबारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नीट' परीक्षेच्या गोंधळातून सुमारे ४ लाख विद्यार्थांची सुटका झाली, आणि तात्काळ शेकडो विद्यार्थी-पालकांनी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी धाव घेतली. यावेळी 'थॅंक यू राजसाहेब' म्हणत सर्वांनी राज यांचे आभार मानले.


'नीट'बाबत चांगला निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज ठाकरे यांनी न्यूझीलंडमधून थेट आभार मानलेत.


गोंधळाचे होते वातावरण


राज ठाकरे म्हणालेत, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्राची 'नीट' (National Eligibility-cum-Entrance Test) द्यायची की राज्य सरकारची CET (Common Entrance Test) द्यायची हा विषय महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू होता. त्यातून विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संभ्रमाचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. याविषयासाठीच मला जेव्हा पालक भेटले तेव्हा मी स्वत: पंतप्रधानाशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो. हा महाराष्ट्रातील ४ लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न असून हे सर्व विद्यार्थी प्रचंड ताणात असल्याचं मी त्यांच्या कानावर घातलं आणि यावर्षीच्या 'नीट' परीक्षेचं बंधन रद्द करावं, अशी मागणी केली.


राज ठाकरेंची प्रतिक्रिया


मला आनंद वाटतो की माझ्या या आवाहनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकारात्मक प्रतिसाद देऊन 'नीट' परीक्षेचं बंधन रद्द केलं आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सुमारे ४ लाख विद्यार्थी एका विलक्षण ताणातून मुक्त झाले आहेत. मी त्या सर्वांना त्यांच्या भावी जीवनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे दिली.