स्वप्निल सोनावणे प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी - आठवले
नेरुळमधलं स्वप्निल सोनावणे या मुलाच्या हत्येचं प्रकरण हे गंभीर आहे... त्यामुळेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी, अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय.
मुंबई : नेरुळमधलं स्वप्निल सोनावणे या मुलाच्या हत्येचं प्रकरण हे गंभीर आहे... त्यामुळेच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी, अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय.
नेरुळ पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही... त्यामुळेच स्वप्नलला जीव गमवावा लागला... या संबंधित पोलिसांवरही कडक कारवाई व्हायला हवी... इतकंच नाही तर या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत व्हावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
का झाला कोपर्डीचा दौरा रद्द?
रामदास आठवले हे कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या अत्याचारग्रस्त कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघणार होते. परंतु, मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि मग आठवलेंनी आपला हा दौरा रद्द केला... याविषयी सांगताना, आपण कोपर्डीला जाण्यासाठी निघालो होतो... मात्र, समजले की त्या पालकांनी भेटण्यास मनाई केली आहे. दलित नेत्यांना इथे येऊ देणार नाही, अशी भूमिका स्थानिक मराठा नेत्यांनी घेतलीय. मुलगी कुठल्याही जातीची असो तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या करणं, हे गंभीरच आहे. आरोपी दलित समाजातले आहेत. त्यांना पाठिशी घालण्याची भूमिका आम्ही घेतली असती तर आम्ही समजू शकलो असतो. मात्र, आरोपी दलित असले तरी या घटनेचा रिपाईनं निषेधच केला आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलंय.
दलित कुटुंबांवर अत्याचार झाला तर मी जातो, मग मराठा समाजातील तरुणीवर अत्याचार झाला तर मी का जाऊ नये? या भावनेतून मी कोपर्डीला जात होतो... या घटनेचा निषेध करण्यासाठी मी तिथं जात होतो... पण, अत्याचारग्रस्त कुटुंबाना मराठा समाजातील नेत्यांच्या दबावामुळे आपल्याला भेटणं नाकारलंय... असंही त्यांनी म्हटलंय.
काल रात्री मुख्यमंत्र्यांचाही फोन आला होता... आता न जाता आठ दिवसांनी एकत्र जाऊयात असं त्यांनी म्हटलंय... कुणा कार्यक्रत्याने दम दिला म्हणून मी घाबरणारा नाही. पण कुटुंबियांचीच मला भेटण्याची इच्छा नाही, त्यामुळे आपण हा दौरा रद्द केला असं आठवले यांनी म्हटलंय.