दीपक भातुसे / अमित जोशी, मुंबई : एकीकडे अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकावरून राज्यात वाद पेटला असताना दुसरीकडे या कार्यक्रमावरून सत्ताधारी भाजपा-शिवसेनेमध्ये मानापमान नाट्य रंगले आहे. इंदू मिलच्या भूमीपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरेंना डावलल्यानंतर शिवसेना प्रचंड संतप्त झाली होती. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी मध्यस्थी करत उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्यासाठी दोन ज्येष्ठ मंत्र्यांना मातोश्रीवर पाठवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा-शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र असले तरी दोन्ही पक्षांमध्ये मतभेद अनेकदा उघडपणे समोर आले आहेत. कामाचे श्रेय घेण्यावरूनही दोन्ही पक्षात अनेकदा वाद विकोपाला गेला आहे. यावेळी या वादाची पुनरावृत्ती होता होता टळली. इंदू मिलचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले तेव्हा प्रोटोकॉलचे कारण देत उद्धव ठाकरेंना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे आता शिवस्मारकाच्या भूमीपूजन कार्यक्रमात तरी उद्धव ठाकरेंना मानाचे स्थान देण्यात यावे अशी थेट मागणीच शिवसेनेने नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील अधिवेशनातच केली.


आपल्या पक्षाच्या नेत्याला मान मिळावा म्हणून शिवसेनेला अशी मागणी करावी लागते यावरून शिवसेनेची हतबलता दिसून आली. शिवसेनेने ही मागणी केल्यानंतरही उद्धव ठाकरेंना शिवस्मारक भूमीपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांबरोबर व्यासपीठावर बसवण्याबाबत सरकार दरबारी कोणत्याही हालचाली दिसत नव्हत्या. यातून शिवसेनेची अस्वस्थता आणखी वाढली. त्यातूनच उद्धव ठाकरे भूमीपूजन कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत, अशा प्रकारची चर्चा शिवसेनेने सुरू केली. या चर्चेनंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी फोन करून उद्धव ठाकरेंना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबले नाहीत तर आपण ठाकरेंना सन्मान देतो हे दाखवण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे या मंत्र्यांना निमेत्रण घेऊन त्यांनी मातोश्रीवर पाठवले.


भाजपा-शिवसेनेमध्ये आगामी मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती होईल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र शिवस्मारकाच्या निमित्ताने दिलजमाई झाल्याचा देखावा दोन्ही पक्षांनी उभा केला आहे. मुख्यमंत्र्यांनीही उद्धव ठाकरेंना सहजासहजी एवढा मान दिलेला नाही. आधीच शिवस्मारकाला विरोध होत असताना शिवसेनेची नाराजी ओढावून चांगल्या कामात विघ्न नको असा विचार मुख्यमंत्र्यांनी केला असावा. त्याशिवाय मेट्रो प्रकल्पाला शिवसेना करत असलेला विरोध मावळावा ही सुद्धा यामागची भूमिका असण्याची शक्यता आहे.


शिवसेना-भाजपा युतीची 1995 साली सत्ता होती तेव्हा कुठल्याही कार्यक्रमावरून असे मानापमान नाट्य रंगल्याचे पहायला मिळाले नाही. यावेळच्या युती सरकारमध्ये हे नाट्य अनेकदा पहायला मिळाले. कदाचित भाजपाच्या जागांच्या तुलनेत शिवसेनेच्या जागा कमी असल्यामुळे भाजपाकडून श्रेयवादाच्या लढाईत शिवसेनेला डावलले जात आहे तर मान मिळवण्यासाठी शिवसेनेला झगडावे लागत आहे.