मुंबई : वादग्रस्त 'सनातन' संस्थेला 'मी नथुराम गोडसे बोलतोय' फेम अभिनेते शरद पोंक्षे यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरावा काहीच नाही, तरीही सनातनच्या विरोधात आरडाओरडा चालूच असल्याचं शरद पोंक्षे म्हणतायत. 


'सनातनवर बंदीची मागणी चुकीची'


एवढी वर्षे सनातनवर बंदीची मागणी होत आहे; पण हाती काहीच लागत नाही. साध्वी प्रज्ञासिंह गेली ८ वर्षे कारागृहात आहे; पण तिच्या वाया गेलेल्या आयुष्याविषयी कुणीही गळा काढतांना दिसले नाही. दाभोलकरांच्या खुनाविषयी सीबीआयने संशयित म्हणून तावडे यांना कोठडीत घेतले आहे. त्यांच्यावरील गुन्हा, पुरावा काहीच सिद्ध झालेले नाही. तरीही आरडाओरडा चालूच आहे. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, तर तो ज्या संस्थेशी निगडित आहे, त्या संस्थेवर बंदीची मागणी कशी होते? संस्थेने गुन्हा करायचा आदेश दिला असेल, तर बंदीची मागणी योग्य आहे. सनातनच्या साधकांवर आरोप झाले की, हे बंदीची मागणी करून मोकळे. मग हाच नियम सर्वांना लावा. भुजबळ आत गेले. आता करा त्यांच्या पक्षाच्या विरोधात बंदीची मागणी. संजय दत्तचा गुन्हाही सिद्ध झाला होता, मग त्याच्या चित्रपटसृष्टीवर बंदीची मागणी का करत नाही ? कारण हिंमत नाही! ती नाही; कारण त्या पक्षाचे प्रमुख बड्या आसामी असतात. त्यांच्या मेहरबानीवर वाहिनी आणि त्यांचा संसार चालतो. सनातनच्या मागे असा मोठा कुणी नाही. पुन्हा ते धर्माने हिंदू, म्हणजे सहिष्णु! हिंदु असल्यामुळे हिंदू समाज पाठीशी उभा रहाणे शक्य नाही. ते एकटे अभय वर्तक काय करणार?, असं शरद पोंक्षे यांनी 'दैनिक सनातन प्रभात'मध्ये छापून आलेल्या लेखात म्हटलंय. 


तावडे, आकोलकरला अटक... 


उल्लेखनीय म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या डॉक्टर वीरेंद्र तावडेला अटक झालीय. यानंतर गोवा स्फोटातल्या आरोपींनीच डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याचं पुढे आलं. वीरेंद्र तावडेच्या चौकशीतून समोर आलेल्या धक्कादायक माहितीत तावडे आणि सारंग आकोलकर या दोघांनी मिळून दाभोलकरांच्या हत्येचा कट रचल्याचं आणि सारंग आकोलकरनं दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचं समोर आलंय.