शिवसेनेला वचननाम्यात मोठ्या मुद्द्याचा विसर
शिवसेनेनं वचननाम्यात अनेक घोषणा केल्यायत. पण एका मोठ्ठ्या मुद्द्याचा शिवसेनेला विसर पडलाय. शिवसेनेचा आत्माच या वचननाम्यात मिसिंग आहे.
दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेनं वचननाम्यात अनेक घोषणा केल्यायत. पण एका मोठ्ठ्या मुद्द्याचा शिवसेनेला विसर पडलाय. शिवसेनेचा आत्माच या वचननाम्यात मिसिंग आहे.
प्रांतिक अस्मितेचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या शिवसेनेनं मराठी माणसाच्या मराठीपणाला हात घातला की अख्खा महाराष्ट्र ढवळून निघत होता..... हटाव लुंगी बजाव पुंगी म्हणत शिवसेना जन्माला आली तीच प्रांतिक अस्मितेचा कैवार घेऊन.... मोठ्या काळानंतर शिवसेनेचा राजकीय पक्ष झाला....
तेव्हापासूनच भावनिक राजकारण हा पक्षाचा आत्मा होता. संयुक्त महाराष्ट्र हा मुख्य आधार आणि 20 टक्के राजकारण-80 टक्के समाजकारण हा शिवसेनेचा नारा होता.... नव्वदच्या दशकात भावनांना हात घालत हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला... त्या जोरावर शिवसेनेला 1995 साली सत्ताही मिळाली. मधल्या काळात मनसे मराठीचा मुद्दा पळवते की काय, अशी भीती वाटल्यावर, शिवसेनेनं आणि आणखी आक्रमकपणे मराठीच्या मुद्द्यावर राजकीय पोळी भाजती ठेवली....पण आता काळ बदलला.... पिढ्या बदलल्या..... आणि शिवसेना विकासाची भाषा बोलू लागली.... 20 टक्के राजकारणाचं शंभर टक्के राजकारण झालं.
1966 ते 2016 या गेल्या पन्नास वर्षांत पक्षात बरीच स्थित्यंतरं झाली. आणि आता तर शिवसेनेच्या वचननाम्यातून प्रांतिक अस्मितेचा मुद्दा चक्क गायब झालाय.......
एकीकडे वचननाम्यात शिवसेना विकासाची स्वप्नं दाखवते आणि दुसरीकडे मुंबईचे तुकडे करण्याचा डाव आणि मराठी माणसाचं अस्तित्व संपवण्याचा विरोधकांचा कट असल्याचे डायलॉग भाषणात मारते. महापालिका शाळांमध्ये टॅब वाटणारी शिवसेना मराठी शाळांचं अस्तित्व टिकवण्याच्या मुद्द्यावर गप्प आहे.... महापालिका निवडणुकीत प्रांतिक अस्मितेविषयी चकार शब्द न काढणारी शिवसेना गोव्यात मात्र त्याच मुद्द्यावर युती करते....
महापालिकेच्या निवडणुका वॉटर, गटर, मीटरवरच लढवल्या जातात.... पण पक्षाचा आत्मा असलेल्या प्रांतिक अस्मितेला शिवसेनेनं पुरतं कंट्रोल ऑल डिलीट करुन टाकलंय.... मग मुंबई-पुण्याचं मराठीपण टिकवायचं कसं.... ? नाशिक-ठाण्यातली नाट्यगृहं टिकायची कशी ? सध्या तरी या प्रश्नाचं उत्तर शिवसेनेच्या अजेंड्यावर नाही..... कारण प्रांतिक अस्मितेचा शिवसेनेचा कणा सध्या लवचिक झालाय... तो कधीही वाकतो आणि गरज लागली तर सरळही होऊ शकतो.....