मुंबई : काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी चांगलंच फटकारलंय. 


'राणेंच्या कर्तृत्वाचं चित्रप्रदर्शन भरवा'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितेश राणे यांनी मुंबईतल्या खड्ड्यांवर चित्रप्रदर्शन भरवण्याऐवजी राजकीय निवडणुकांत कार्यकर्त्यांना गायब करणे, जमिनी हडपणे, जमीन मालकांना गायब करणे, खून करणे अशा काही मोजक्या कर्तृत्वांची छायाचित्र काढावीत आणि त्याचं प्रदर्शन भरवावं... ते त्यांच्या कुटुंबाला अधिक शोभेल... हवं तर गोवेकर, श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, चिंटू शेख आणि अगदी अलीकडचा सावंत यांच्या कुटुंबियांशी संपर्क करावा ते अधिक माहिती देतील, अशी कडवट प्रतिक्रिया मनीषा कायंदे यांनी दिली.


'कुटुंबियांच्या आयुष्यातली पोकळी भरून काढा'


नितेश राणे यांनी मुंबईतील रस्त्यांचे खड्डे मोजण्यापेक्षा त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात झालेली पोकळी भरून काढावी त्यांची छायाचित्र काढावीत आणि त्याचं प्रदर्शन भरवावं, आम्हीदेखील ते पाहायला येऊ असा टोलाही त्यांनी यावेळी निलेश राणेंना लगावलाय. गोवा टोल नाक्यावर हाणामाऱ्या करून टोल चुकवण्याची छायाचित्रंही त्यांनी काढावी आणि त्यांचे प्रदर्शन भरवावे आणि स्वतःचे छायाचित्र त्यासोबत लावावं, असंही त्यांनी म्हटलंय.


'ठाकरे कुटुंबियांबद्दल बोलणं टाळा'


राणे कुटुंबीयांनी शिवसेनेबद्दल आता अधिक न बोलण्यातच त्यांचं भलं आहे, आधीच नारायण राणेंना दोन वेळा सेनेने धोबी पछाड दिली आहे, छोटा राणेने वेळीच तोंड बंद केलेले बरे... मुंबईच्या रस्त्यांची काळजी घ्यायला शिवसेना समर्थ आहे, उद्धव साहेब स्वतः रस्त्यावर उतरून रात्री बेरात्री सामान्यांना त्रास होऊ नये म्हणून खड्डे बुजवण्यासाठी उभे राहून काम करून घेतात, आदित्य ठाकरे स्वतः या रस्त्यांच्या कामांवर लक्ष ठेऊन असतात, मुंबईत आता सर्वाधिक पाऊस पडूनही मुंबई तुंबली नाही, याचं श्रेय मुंबई महानगरपालिका आणि शिवसेनेला आहे. खड्ड्यांची समस्याही अशीच लवकरात लवकर दूर होईल, असंही मनिषा कायंदे यांनी म्हटलंय. 


काय म्हटलं होतं राणेंनी...


याआधी, ’मुंबईत खड्डे की खड्ड्यांची मुंबई’ नावाचं चित्रप्रदर्शन भरवत राणेंनी महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. 'आता मुंबईकरांच्या डोक्यावरून पाणी गेले आहे. गेली २५ वर्षे मुंबईकरांना खड्ड्यात घालणाऱ्या सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीने मुंबईकरांच्या जीवाशी खेळ केला आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांना पालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवून खड्ड्यात पुरण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे नितेश राणेंनी केला होता.