`जीएसटी`साठी राज्याच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या विधेयकाला मंजुरी देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन आज बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनामध्ये वस्तू व सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी घेण्यात येईल.
मुंबई : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या विधेयकाला मंजुरी देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन आज बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनामध्ये वस्तू व सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी घेण्यात येईल.
वस्तू व सेवा कर विधेयक घटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळे त्याला देशातील सर्व राज्यांच्या विधिमंडळांच्या सभागृहांची मंजुरीही आवश्यक आहे. त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातील विधानसभांमध्ये हे विधेयक मांडण्यात येत असून, त्याला मंजुरी देण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आयोजित या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह विविध आमदार उपस्थित होते. तर या विधेयकाबाबत काही गोष्टींबाबत सरकारकडून उत्तरं घेणार असून काँग्रेस या विधेयकाला विरोध करणार नसल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.