मुंबई : राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, शिवसेनेला दोन राज्य मंत्रीपदे देण्याच्या हालचाली सुरु असून कॅबिनेट पद मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना भाजपमध्ये कुरखोडी सुरुच आहे. भाजपला प्रत्येक गोष्टीत कोंडीत पकडण्यात सेनेने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेला कॅबिनेट देण्याचा विचारात नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, अन्य मित्र पक्षांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याबाबत विचार विनिमय होत आहे. मात्र, त्यांना संधी मिळेल की नाही याबाबत अनिश्चितता आहे.


भाजप प्रदेश कार्यकारिणीची पुणे बैठक होत आहे. या बैठकीआधीच मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी मीडियात कोणतीही बातमी येऊ नये तसेच मंत्रिमंडळाबाबत प्रश्न येण्याची शक्यता असल्याने विस्ताराचा खटाटोप आहे. 


या आधीचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकला होता. भाजपची अलाहाबादमधील राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काल झाली. या बैठकीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराच्या निर्णयाला अंतिम स्वरूप देणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.


नव्याने होणाऱ्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात लवकरच चर्चा करणार आहे. असे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात आलेय. एकमेकांना दुखावण्याऐवजी एकमेकांच्या सोबत राहूनच काम करावे, असे शिवसेना आणि भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना वाटते. त्यामुळे नव्या विस्तारात शिवसेनेला स्थान देण्याचे ठरल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांने स्पष्ट केलेय. 


भाजपचा खांदेपालट?


भाजपचे मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रिपदाऐवजी महामंडळांचे अध्यक्षपद तसेच विनोद तावडे यांच्यावर विधान परिषद सभागृह नेतेपदाची जबाबदारी पडण्याची शक्यता आहे. नव्या जबाबदारीमुळे तावडे यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली येऊ शकते तर पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडील वस्त्रोद्योग आणि पणन ही खाती नव्या मंत्र्यांना दिली जाऊ शकतात. तसेच अनेक वादामुळे राजीनामा द्यावे लागलेले एकनाथ खडसे यांच्याकडील अनेक खात्यांचा पदभार अन्य मंत्र्याकडे सोपविला जाणाऱ्याची शक्यता आहे.