वडापावसाठी मारहाण करणाऱ्या महाडिकची युवा सेनेतून हकालपट्टी
फुकटच्या वडापावसाठी गुंडगिरी करणाऱ्या सुनील महाडिकची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. विलेपार्ल्यात फुकट वडापावसाठी युवासेनेच्या पदाधिका-यानं दुकानदाराला बांबूनं मारहाण केली होती.
मुंबई : फुकटच्या वडापावसाठी गुंडगिरी करणाऱ्या सुनील महाडिकची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. विलेपार्ल्यात फुकट वडापावसाठी युवासेनेच्या पदाधिका-यानं दुकानदाराला बांबूनं मारहाण केली होती.
शनिवारी २६ फेब्रुवारीला विलेपार्लेच्या मैदानात साहेब क्रिकेट चषकाचे सामने भरवण्यात आले होते. या सामन्यासाठी तृप्ती फरसाण मार्टच्या मॅनेजरकडून युवासेनेचा पदाधिकारी सुनील महाडिक यानं मोफत १०० वडापावांची मागणी केली. मात्र चेतन पटेल यांनी फुकट वडापाव देण्यास नकार दिला. त्यामुळं संतापलेल्या सुनील महाडिकनं दुकानात घुसून पटेल यांना बांबूनं बेदम मारहाण केली.
यात पटेल हे जखमी झाले असून त्यांच्यावर कूपर रूग्णालयात उपचार करण्यात आले. सुनील महाडीकला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. हा गुंडगिरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातही शिवसेनेच्या माजी शाखाप्रमुखानं महिला वाहतूक पोलिसाला मारहाण केली होती.