मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन चर्चा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी भुजबळ यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चा रंगली होती. मराठा मोर्चांना प्रतिउत्तर देण्यासाठी ओबीसी मोर्चा काढण्यासाठी ही भेट असल्याचे म्हटले जात होते. आज दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.


दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंकजा मुंडे यांच्या भेटीनंतर भाजवर टीका केली होती. त्यानंतर भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांनी भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क लढविले जात आहेत.


तसेच राष्ट्रवादी भुजबळांपासून दोन हात लांब राहिल्यामुळे शिवसेनेने सामना दैनिकातून तीव्र शब्दात टीका केली होती. तर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीचे कौतुक केले होते. पंकजा यांच्यासारखे राष्ट्रवादीने धाडस करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्याने चर्चा रंगली आहे.