सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : राज्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढत चाललाय. स्वाईन फ्लूचा वाढता धोका पाहून आरोग्य खात्यानं खासगी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करणा-या डॉक्टरांबात कडक भूमिका घेण्याचं आरोग्य विभागानं ठरवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात उन्हाचा कडाका जसा वाढतोय तसा स्वाईन फ्लूचाही कहर वाढत चाललाय. आतापर्यंत पाच महिन्यांत तब्बल 180 पेक्षा जास्त लोक दगावलेत. तर साडेनऊशे जणांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणं आढळलीत. 


मुंबईत स्वाईन फ्लूचे 26 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झालाय. पुण्यात 263 पॉझिटिव्ह तर 47 जणांचा मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये 134 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून 20 जणांचा मृत्यू झालाय. सोलापूरमध्ये 15 पॉझिटिव्ह तर चौघांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झालाय. 


नाशिकमध्येही स्वाईन फ्लूचा कहर पाहायला मिळतोय. इथं 152 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 31 जणांचा मृत्यू झालाय. औरंगाबादमध्ये 83 पॉझिटिव्ह रुग्ण आणि 26 जणांचा मृत्यू तर नागपुरात 70 रुग्ण पॉझिटिव्ह तर 11 रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झालाय. 


वातावरणातील बदलामुळे स्वाईन फ्लू फोफावत असल्याचं डॉक्टर सांगतायत. स्वाईन फ्लूपासून बचाव करण्यासाठी रुग्णांनी अधिक काळजी घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केलीय. 


स्वाईन फ्लूचा राज्यात कहर सुरु असताना सरकारी यंत्रणा मात्र खासगी रुग्णालयाकडं बोट दाखवतंय. खासगी डॉक्टरांनी रूग्णाबाबत तात्काळ टॅम्बी फ्लू वापरावे असे सरकार म्हणतंय.


गेल्या तीन वर्षांपासून राज्यात स्वाईन फ्लूनं कहर मांडलाय. अशा परिस्थितीतही सरकारी यंत्रणेला जाग आलेली नाही ना खासगी डॉक्टर याबाबत तत्परता दाखवतायत. त्यामुळं दरवर्षी स्वाईन फ्लूनं रुग्ण दगावत असल्याची संख्या वाढतच चालल्याचं पाहायला मिळतंय.