वडापाव @ 50 : या वडापावची चव बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी यांनीही चाखलेय!
वडापाव म्हणजे मुंबईकरांचा इंडियन बर्गर. मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत एक तरी वडापावचं दुकान तुम्हाला दिसेल आणि इथल्या प्रत्येक दुकानानं आणि तिथं मिळणा-या वडापावनं आपल्या चवीनं स्वत:ची वेगळी ओळख केली आहे. अशाच एका अप्रतिम वडापावची ही कहाणी. `आराम`चा वडापाव.
मुंबई : वडापाव म्हणजे मुंबईकरांचा इंडियन बर्गर. मुंबईतल्या प्रत्येक गल्लीत एक तरी वडापावचं दुकान तुम्हाला दिसेल आणि इथल्या प्रत्येक दुकानानं आणि तिथं मिळणा-या वडापावनं आपल्या चवीनं स्वत:ची वेगळी ओळख केली आहे. अशाच एका अप्रतिम वडापावची ही कहाणी. 'आराम'चा वडापाव.
दक्षिण मुंबईतलं सीएसटी, मुंबई महापालिकेच्या समोरचे हे प्राईम लोकेशन.. याच ठिकाणी 8 ऑगस्ट 1939मध्ये म्हणजे अगदी इंग्रजांच्या काळात भाऊ उर्फ श्रीरंग तांबे या मराठी माणसानं हॉटेल सुरु करण्याचं स्वप्न पाहिलं.. 'मिल्क बार' नावानं त्यांनी स्वप्न प्रत्यक्षात साकारलंही.. त्यांचं हे हॉटेल आता 'आराम'नावानं ओळखलं जातं.. आराम हॉटेल आणि वडापाव.. कमी पैशात कोणाचंही पोट भरेल हे भाऊंनी पाहिलेलं स्वप्न इथं आजही आरामात पूर्ण होतं. आरामच्या वडापावची चव तर काही औरच.
आरामचा वडापाव तुम्हाला चीझ, बटर ग्रिल्ड पावसोबत किंवा नुसताही मिळतो... या वडा पावचं वैशिष्ट्य म्हणजे वड्याची भाजी पांढऱ्या रंगाची असते. या भाजीची रेसिपी श्रीरंग तांबे पती-पत्नी यांनी बनवली.. त्याची चव कायम राहावी यासाठी हॉटेलचे व्यवस्थापक जातीनं लक्ष देतात.. तांबे कुटुंबाची तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळते.. मात्र वड्याच्या चवीत तसुभरही फरक पडलेला नाही..
केवळ वडापावच नाही तर आराममध्ये अनेक चविष्ठ मराठमोळे पदार्थही मिळतात. इथले सर्व कर्मचारीही मराठीच आहेत.. या हॉटेलचा सध्याचा वर्षाचा टर्नओव्हर आहे 2 कोटी रुपये.
1939 मध्ये मंदीच्या काळात तांबेच्या या व्यवसायानं जम बसवला.. यानंतर 1942मध्ये गवालिया टँक इथं काँग्रेसचं शिबिर भरलं होतं.. तेव्हा तांबेच्या मिल्कीबार हॉटेलची कॅटर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून माजी पंतप्रधान राजीव गांधीपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी इथल्या वडापावची चव चाखलीये.. अगदी दिल्लीलाही विमानानं हा वडा जायचा म्हणे... तेव्हा मुंबईचा इतिहास अगदी जवळून पाहिलेल्या आरामच्या वड्याची चव एकदा तरी चाखून बघाच.