विरोधक राज्यातील मंत्र्याच्या घोटाळ्यांवरून आक्रमक होण्याची शक्यता
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनांचे पहिले दोन दिवस कोपर्डी बलात्कार प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आज विरोधक मंत्र्याच्या घोटाळ्यांवरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज सकाळी दहा वाजता विधानपरिषदेची दोन तासांची विशेष बैठक बोलवण्यात आली आहे.
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनांचे पहिले दोन दिवस कोपर्डी बलात्कार प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आज विरोधक मंत्र्याच्या घोटाळ्यांवरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज सकाळी दहा वाजता विधानपरिषदेची दोन तासांची विशेष बैठक बोलवण्यात आली आहे.
मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झालेल्या पाच मंत्र्याविरोधात विविध प्रकरणात आरोप झालेले आहेत. तर काही मंत्री आधीच वादग्रस्त आहेत. त्याबाबत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेली रेनकोट खरेदी आणि वीज दरवाढिविरोधात विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात येणार आहे. तर राज्यातील शैक्षणिक स्थितीविषयी सत्ताधारी पक्षातर्फे चर्चा उपस्थित करण्यात येणार आहे.
बुधवारी सकाळी १० वाजता विधानपरिषदेची दोन तासांची विशेष बैठक बोलवण्यात आली आहे. यामध्ये कोपर्डी बलात्कार प्रकरणवर सुरु असलेली चर्चा पूर्ण होणार आहे. या चर्चेला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत. मंगळवारी विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे आणि नारायण राणे यांनी कोपर्डी प्रकरणी सत्ताधा-यांवर बोचरी टीका केली होती. तेव्हा मुख्यमंत्री या टिकेला काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते. त्याचबरोबर मुंबई घन कचरा व्यवस्थापन, पंढरपुर - चंद्रभागा स्वच्छता असे काही विषय चर्चेसाठी येणार आहेत.