मुंबई : आमीर खानचा दंगल सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पण याच दंगलचा आधार घेऊन, थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये वेगळीच नशा रंगणार आहे. कारण पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ड्रग माफियांनी नवीन कोडवर्ड तयार केलेत आणि  हेच कोडवर्ड डीकोड करणारा हा खास रिपोर्ट. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नववर्षाच्या पार्ट्यांमध्ये नशेखोरांची 'दंगल'
ड्रग्जच्या आखाड्यात 'गीता-बबिता'ची धूम
थर्टी फर्स्टच्या पार्टीवर 'ताऊ'ची नशा?
ड्रग्ज माफियांना का वाटतेय 'बापू'ची भीती? 

 
नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्ट्यांमध्ये यावेळी दंगल रंगणाराय ती गीता आणि बबिताची. अर्था ताऊ देखील रडारवर आहेच. आता हे सगळं ऐकून तुम्हाला वाटेल की, आमीर खानच्या दंगल सिनेमातल्या पात्रांनी काहीतरी राडा घातलाय. तर प्रेक्षकहो, असं काही झालेलं नाही. ही पात्रांची नावं म्हणजे कोडवर्ड आहेत आणि ते तयार केलेत ड्रग्ज माफियांनी. 


थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांसाठी काही तास उरलेत. या पार्ट्यांसाठी ड्रग्ज माफियांनी ही तयारी केलीय. गेल्या काही वर्षांत आलिया, करीना, कटरीना, प्रियंका, ऐश्वर्या या अभिनेत्रींच्या नावावरून कोडवर्ड तयार करण्यात आले होते. यावर्षी दंगलची धूम असल्यानं त्यानुसार कोडवर्ड बनवण्यात आलेत.


 हे आहेत कोडवर्ड


- दंगल - ड्रग्ज
- आखाडा - पार्टी आणि लोकेशन
- ताऊ - कोकेन
- गीता - मेफेड्रोन (म्याऊं-म्याऊं) ड्रग्ज
- बबिता - एलएसडी ड्रग्स
- बापू - पोलीस
- तब्येत बिघडली - छापा पडणे
 
खब-यांच्या मदतीनं मुंबई पोलिसांनी हे कोडवर्ड डीकोड केलेत. अशा पार्ट्यांवर मुंबई पोलिसांची खास नजर असणार आहे. अंमली पदार्थांचा व्यवसाय करणा-यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. ड्रग्ज माफियांचे कोडवर्ड मुंबई पोलिसांना समजलेत. आता पोलिसांपुढं खरं आव्हान आहे ते अंमलबजावणीचं. बापू अर्थात पोलीस खरंच नशेखोरांची दंगल थांबवू शकतील का, असा प्रश्न विचारला जात आहे.