उद्धव ठाकरे यांनी घेतली राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र, या भेटीबाबत राजकीय चर्चा रंगली आहे.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सदिच्छा भेट घेतली. मात्र, या भेटीबाबत राजकीय चर्चा रंगली आहे.
आगामी जुलै महिन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यंदा भाजपला शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज लागणार नाही. कारण पाच राज्याच्या विशेषतः उत्तर प्रदेश निकालामुळे भाजपकडे राष्ट्रपती निवडीसाठी मतांचे आवश्यक संख्याबळ आहे. मात्र, एनडीएचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रपती पदाचा उमेदवार देताना शिवसेनेला विश्वासात घेतले जावं असा सूर सेनेच्या गोटात आहे.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी सध्या अनेक नावांची चर्चा सुरु आहे. त्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची नावं आघाडीवर आहेत. या वर्षाअखेरीस होत असलेल्या गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचं ही नावही अचानक स्पर्धेत आणलं गेलं आहे.
मात्र, प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपती पदाची कारकीर्द वादातीत असल्याने राष्ट्रपती पदी त्यांची पुन्हा निवड केल्यास शिवसेनेची त्याला हरकत नाही अशी भूमिका याआधीच शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपत असताना शेवटच्या टप्प्यात उद्धव आणि प्रणव मुखर्जी या दोघांचीही एकमेकांना भेटण्याची इच्छा होती. आज मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने हा योग्य जुळून आलाय.
याआधी UPA राजवटीत मुखर्जी यांनी थेट मातोश्री वर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. आणि पाठिंबा मागितला होता. आता पुन्हा एकदा मुखर्जी-ठाकरे यांनी एकमेकांची भेट घेऊन दोघे एकमेकांना अनुकूल असल्याचे संकेत दिले असल्याची यानिमित्ताने चर्चा सुरु झालीय.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मुद्दा घेऊन मुख्यमंत्री मंत्र्यांच्या शिष्टमंडळासह दिल्ली दरबारी पोहचण्याआधीच उद्धव ठाकरे हा मुद्दा राष्ट्रपतींसमोर मांडून मोदींना शह देण्याची संधी सोडणार नाहीत असंच दिसतंय.