मुंबई : शेतकऱ्यांचा प्रश्न तात्काळ सोडवला पाहिजे. सध्या तुरीच्या मुद्यावर सरकारने तातडीने पावले उचलावी, अशी मागणी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यासंदर्भात शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे पण शिवसेना त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शिवसेना ठामपणे शेतकऱ्यांच्या मागे आहे. हे इतकं ताणले जाण्याची गरज नव्हती. शेतकरी रस्त्यावर उतरले तेव्हाच पटकन दखल सरकारने घेतली पाहिजे. शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची गरज लागणार नाही असा कारभार केला पाहिजे. मला तशी अपेक्षा आहे, असे मत उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले. 


तूर शेतकऱ्याला दिलासा,  १ हजार कोटी रुपये 


दरम्यान, तुरीच्या खरेदीसंदर्भात राज्यातल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी राज्य सरकार आणखी १ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचं मुख्यमंत्री देवंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. २२ एप्रिलपर्यंत नोंदणी झालेल्या सर्व शेतक-यांची तूर खरेदी करण्यात येईल असंही फडणवीसांनी सांगितलं. तूर खरेदीच्या संदर्भात काल केंद्रात बैठक झाली. पीएमओ बरोबरही बैठक झाली. त्यात रांगेत उभे असलेल्या शेतक-यांची सर्व तूर राज्य सरकार खरेदी करणार असल्याचा निर्य़ण घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेय. तूर व्यापा-यांची आहे की शेतक-यांची हे तपासूनच खरेदी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.  


 आमदार बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित


तूर खरेदीसंदर्भातल्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ठिय्या आंदोलन स्थगित केले आहे. अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. मात्र रांगेतल्या शेतक-यांचा तूर खरेदी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर कडु यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलंय.  पण शेतक-याच्या  घरात असलेला सर्व तूर खरेदी होईपर्यंत हे आंदोलन थांबवणार नसल्याचं अपक्ष आमदार बच्चु कडू यांनी सांगितलंय. एकंदरीत तुरीचा मुद्दा आता जास्तच तापणार असंच सध्याचं वातावरण दिसतंय. 


शेतकऱ्यांचे हाल सुरुच


मुख्यमंत्र्यांनी रांगेत असलेल्या सगळ्यांची तूर खरेदीचे आश्वासन दिलंय खरं मात्र असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून शेतक-यांचे तूर खरेदी केंद्रावर हाल सुरू आहेत. सगळेच हतबल झालेत. औरंगाबादमधल्या पैठणच्या शेतक-यांची व्यथा पाहायला मिळत आहे.


पैठण तालुक्यातल्या 70 वर्षीय शेतक-याकडे केवळ 10 पोती तूर निघाली. ही तूर विकायला गेले 6 दिवस ते पैठणच्या बाजार समितीत वाट पाहात बसलेत. मात्र त्यांना कुणीही दाद दिलेली नाही. पैठणच्याच साजिद पठाण या तरुण शेतक-याचीही अशीच अवस्था आहे. त्यांच्याकडे 50 पोती तूर आहे. 


तूर खरेदीची काय परिस्थिती....


1) यवतमाळ मधील तूर खरेदीचा प्रश्न अजून मिटलेला नाही. २२ एप्रिल पर्यंत टोकन उचल केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करू असे सांगत ताबडतोब तुरीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशही अंमलात आले नाही. नाफेडच्या केंद्रांना टाळे लागलंय.


2) तूर खरेदी बंद झाल्यानंतर नागपुरात अजूनही एक हजार क्विंटलपेक्षा जास्त तूर पडून आहे.  तूर खरेदी सुरुवात केल्यापासून ते बंद होईपर्यंत 29 हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. मध्यंतरी बारदाणा नसल्याचे कारण समोर करीत अनेक शेतक-यांची तूर खरेदीच केली गेली नाही.. 


3) अकोला जिल्ह्यातील नाफेडच्या पाच खरेदी केंद्रांवर अजूनही एक लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर खरेदीविना पडून आहे. तूरीच्या मुद्यावरुन अकोल्यात शिवसंग्राम संघटनेने सरकारला घरचा आहेर दिलाय. शिवसंग्राम संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय. 


4) सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये हजारो क्विंटल तूर शेतकऱ्याकडे शिल्लक असल्याने शेतकरी हवालदिल झालाय. सरकार ने पुन्हा तूर केंद्रे सुरु करावीत अशी मागणी जोर धरतेय. व्यापारी तूर जास्त झाल्याने खरेदी करण्यास नकार देतायेत..


5) परभणी जिल्ह्यातील नाफेडच्या केंद्रांवर हजारो क्विंटल तूर शिल्लक असून तिसऱ्या दिवशी हि तुरीने भरलेली वाहने रांगा लावून उभी आहेत. जोपर्यंत हि तूर विकली जाणार नाही तोपर्यंत शेतकरी नाफेडच्या केंद्रावरून परत जायला तयार नाहीयेत. 


6) लातूर जिल्ह्यात जवळपास १ लाख क्विंटल तूर अद्यापही शिल्लक आहे.जळकोट येथील तूर केंद्रावर अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या नावाने तूर विक्री करीत आहेत. जळकोट येथील व्यापाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांचा सात-बारा लावून तूर विक्रीचा घाट घातला आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत. 


7) जालना तूर खरेदी केंद्र सुरु करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीनं उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय. यावेळी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना गोणी भरून आणलेली तूर भेट म्हणून दिली.