मुंबई : ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचे आज निधन झाले. अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोविंद तळवलकर यांनी 'लोकसत्ता' या वर्तमानपत्रांचे उप संपादकपद भूषवले होते. एक व्यासंगी पत्रकार अशी त्यांची ओळख होती. गोविंद तळवलकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह, राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय राजकीय सामाजिक घडामोडींचा साक्षीदार हरपला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 


गोविंद तळवलकर यांचा जन्म २२ जुलै १९२५ झाला. ते इंग्लिश आणि मराठीतले व्यासंगी पत्रकार व लेखक अशी त्यांची ओळख. वृत्तपत्रीय अग्रलेखांकरिता विशेषत्वाने परिचय असलेले ते एक स्तंभलेखक होते. तळवलकर हे लोकसत्ताचे काही वर्षे उप-संपादक आणि महाराष्ट्र टाइम्सचे तब्बल २७ वर्षे संपादक होते.


गोविंद तळवलकरांनी १९४७ साली बी.ए. झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या नवभारतमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे १९५० ते १९६२ अशी बारा वर्षे ते लोकसत्तामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत होते. १९६२-६७ च्या दरम्यान त्यांना महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. 


१९६८ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि पुढे १९९६ पर्यंत म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षे महाराष्ट्र टाइम्ससारख्या अग्रणी वृत्तपत्राचे संपादक म्हणून आपली कारकीर्द त्यांनी गाजवली.  


टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन अशा इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांतूनही तळवलकरांनी लेखन केले. सध्या ते "Asian Age" या इंग्रजी वृत्तपत्रासाठी अमेरिकेतून लेखन करीत होते. विविध विषयांवरती तब्बल 25 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.