मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला. कर्जमाफी झाल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिस-या दिवसाचं कामकाज सुरु होण्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन केलं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर सभागृहात कामकाज सुरु झाल्यानंतरही विरोधकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला.. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी याच मागणीसाठी अध्यक्षांच्या आसनासमोर धावही घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार तोंडसुख घेतलं.


कर्जमाफीसाठी कसली वाट पाहताय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच तुम्ही कर्जमाफी द्या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करु असा टोला अजित पवारांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.. तर आम्ही कर्जमाफीला कधीच विरोध केला नाही, शेतकरी सक्षम झाला की कर्जमाफीचा विचार केला जाईल असं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं. मात्र यावर समाधान न झाल्यानं विरोधकांनी गोंधळ घातला आणि सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.