मुंबई : टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागची अनेक गोलंदाजांना भीती वाटायची, मात्र सेहवागला एका गोलंदाजाची भीती वाटायची, ही कबुली खुद्द वीरेंद्र सेहवागने दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेहवागने हे गुपीत उघड करताना म्हटलं आहे, 'श्रीलंकेचा माजी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन असा होता की, क्रिकेटमधील माझ्या १४ वर्षाच्या कारकिर्दीत  मला फक्त त्याची भीती वाटायची'.


सेहवागने मुरलीधरनचं कौतुक देखील केलं आहे, सेहवाग म्हणतो,  मुरलीधरनचा अचूक टप्पा आणि गोलंदाजी शैलीमुळे त्याच्या गोलंदाजीवर खेळणं अवघड होतं. मुरलीधरनने १३२ कसोटी सामन्यात ८०० विकेट घेतल्या.


मुरलीधरनने ३ वेळा सेहवागला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. क्रिकेट कारकिर्दीत सेहवाग आणि मुरलीधरन यांचा अनेकदा सामना झाला. 


श्रीलंका दौऱ्यात २००८ मध्ये मात्र सेहवागने मुरलीधरन आणि अजंता मेंडिस यांच्या गोलंदाजीवर चांगलाच प्रहार केला होता. गॅले कसोटीत सेहवागने नाबाद २०१ धावा ठोकल्या होत्या.


याशिवाय सेहवाग आणि मुरलीधरन यांच्यातील आणखी एक युद्ध २००९ मध्ये मुंबई कसोटीत पाहायला मिळालं होतं. त्यावेळीही सेहवागने श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई करत २९३ धावा ठोकल्या होत्या.


 मुरलीच्या ‘दुसरा’ने तर अनेक फलंदाजांना धडकी भरवली होती.पण सेहवागने अनेक गोलंदाजांची धुलाई केली, त्यामध्ये मुरलीधरनचाही समावेश असला, तरी त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे सेहवाग काहीसा गोंधळत होता.


मुरलीधरन जेव्हा निवृत्त झाला, त्यावेळी जगातील सर्वाधिक कसोटी विकेट घेण्याचा विक्रम मुरलीधरनच्या नावावर होता. मुरलीधरनच्या गोलंदाजी शैलीवर अनेकवेळा आक्षेप घेण्यात आले. मात्र मुरलीधरन सर्व समस्यांना सामोरा गेला.