`छोटा भाऊ म्हणून युतीसाठी अजूनही तयार`
छोटा भाऊ म्हणून मनसे शिवसेनेसोबत युतीसाठी अजूनही तयार आहे, अजूनही वेळ गेलेली नाही
मुंबई : छोटा भाऊ म्हणून मनसे शिवसेनेसोबत युतीसाठी अजूनही तयार आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. मनसेसोबत युती केली तर शिवसेनेलाच फायदा होणार आहे. मनसेची परिस्थिती आणखी काय वाईट होणार असंही बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. मातोश्रीवर जाऊन सध्या मनसेकडे आहेत तेवढ्या जागा आम्हाला द्या बाकी काही नको, असं सांगितल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.
शिवसेनेसोबत युती करण्यासाठीचा प्रस्ताव घेऊन बाळा नांदगावकर हे रविवारी मातोश्रीवर गेले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली पण आज उद्धव ठाकरेंनी युतीच्या चर्चांवर पडदा टाकला. कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही, राज्यात सगळीकडे स्वबळावर लढणार अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली.