छगन भुजबळ अटकेपासून आणखी किती दूर?
(दीपक भातुसे, झी २४ तास) महाराष्ट्र सदन आणि कालिना भूखंड घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतर, आता ईडीनेही भुजबळ कुटुंबियांविरोधात फास आवळले आहेत. त्यामुळे भुजबळांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत.
मुंबई : (दीपक भातुसे, झी २४ तास) महाराष्ट्र सदन आणि कालिना भूखंड घोटाळाप्रकरणी छगन भुजबळ यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्यानंतर, आता ईडीनेही भुजबळ कुटुंबियांविरोधात फास आवळले आहेत. त्यामुळे भुजबळांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत.
एकीकडे ईडीने अटक केलेल्या समीर भुजबळ यांची आठ दिवसांची ईडी कोठडी संपल्यानंतर, आता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. तर उद्या छगन भुजबळ मुंबईत परतत असून ते पत्रकारांना सामोरे जाणार आहेत.
राज्याच्या राजकारणातील एक लढवय्या नेता म्हणून छगन भुजबळ यांची ओळख. आतापर्यंत ते लढत होते ते आपल्या राजकीय विरोधकांशी, पण आता त्यांना सामना करावा लागतोय तो तपास यंत्रणांचा.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा, कलिना येथील भूखंड गैरव्यवहार आणि नवी मुंबईतील हेक्स सिटी प्रकल्पातील गैरव्यवहार अशा विविध प्रकरणात चौकशीचे शुक्लकाष्ट भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे लागले आहे.
मनी लॉर्डिंग प्रकरणी पुतणे समीर भुजबळ यांना अटक करून ईडीने छगन भुजबळ यांना पहिला धक्का दिलाय. आता याप्रकरणात ईडी भजुबळ यांचा मुलगा पंकज आणि स्वतः भुजबळ यांची चौकशी करणार असल्याचे समजते. या सगळ्याचा सामना करताना भुजबळांची आता दमछाक सुरू आहे. इकडे समीर भुजबळ यांना अटक झाली, तेव्हा छगन भुजबळ अमेरिकेला एका चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी गेले होते.
समीर भुजबळांना अटक होताच अमेरिकेवरून भुजबळांनी प्रतिक्रया देत हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला होता. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सरकार सुडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप करत पक्ष भुजबळांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असल्याचे सेकत दिले आहेत.
समीर भुजबळ यांनी एक आठवडा ईडीच्या कोठडीत घालवल्यानंतर त्यांना आता १४ दिवस न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात स्वतः छगन भुजबळ आणि त्यांचा मुलगा पंकज भुजबळ यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यातच अमेरिकेला गेलेले भुजबळ मुंबईत परतत आहेत.
मुंबईत परतल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहे. यापूर्वी भुजबळांनी ईडीने केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली आहे, आता परत भुजबळ या कारवाईबाबत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तसंच छगन भुजबळ परतल्यानंतर ईडी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत काय पाऊल उचलणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
मनी लॉर्डिंग प्रकरणी ईडीला भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ठोस पुरावे मिळाल्याचा दावा केला जातोय. तर छगन भुजबळ यांनाही लवकरच अटक होणार असल्याचा दावा भाजपाचे खासदार किरीट सोमय्या करत आहेत. त्यामुळेच आता छगन भुजबळ या सगळ्याचा मुकाबला कसा करणार, आणि ईडीची भुजबळांविरोधात पुढील कारवाई काय असेल, याबाबत उत्सुकता आहे.