मुंबई : भारतीय लष्कराचा जवान चंदू बाबुलाल चव्हाणची सुटका २० दिवसात व्हायला हवी. कारण अनेक वेळा भारतीय जवान चंदू सारखे पाकिस्तानी जवानही लाईन ऑफ कंट्रोलपार करून भारतात येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हा अशा जवानांना त्यांच्या देशाकडे सोपवलं जातं, यासाठी काही सोपस्कार पार पडतात. यासाठी जास्तीत जास्त २० दिवस जातात. २० दिवसानंतर असे जवान मायदेशी परत पाठवले जातात, असा शिरस्ता आहे.


मात्र या काळात भारतीय मीडिय़ाला संवेदनशील रहावं लागेल. खास करून इंग्रजी दैनिक आणि वृत्त वाहिन्यांनी या बातमीला काही दिवस महत्व दिलं नाही तरी चालणार आहे.


कारण इंग्रजी बातम्या या सीमेपलीकडे वाचल्या जातात. आणि चंदू चव्हाण पाकिस्तानात अडकणे हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. हे पाकिस्तानला लक्षात आलंय. त्यामुळेच की काय चंदू प्रकरणात पाकिस्ताने पुन्हा चालढकल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.


कारण चंदू पाकिस्तानकडे सापडलाय. हे पाकिस्तानचं दैनिक डॉनच्या ऑनलाईन वेबसाईटकडूनच भारताला कळलंय. मात्र ही बातमी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी चंदू आपल्याकडे नसल्याची वल्गना पाकिस्तानने केली.


सर्जिकल ऑपरेशन २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा ते पहाटे साडेचार पर्यंत चाललं, त्याचं दिवशी दुपारी दीड वाजता चंदू चव्हाणला पाकिस्तानात अटक झाली. चंदूचा ऑपरेशनशी काहीही संबंध नसल्याचं भारत सरकारने म्हटलंय.


चंदू बाबुलाल चव्हाणला २९ सप्टेंबर रोजी पाकिस्तानने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून ताब्यात घेतलं, चुकून सीमा पार केलेल्या सैनिकाला परत पाठवण्यासाठी २० दिवसाचा कालावधी जातो. २० दिवसांच्या आत म्हणजे १९ ऑक्टोबरपर्यंत आपला जवान चंदू चव्हाण परतेल अशी अपेक्षा आपण निश्चितच करू या.


चंदूचं आईवडिलाचं छत्र लहानपणीच हरवलं आहे. चंदूची आजी चंदू पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये पकडला गेला, या धक्क्याने वारली. चंदूचा भाऊ देखील भारतीय लष्कराच्या सेवेत आहे.