मुंबईच्या रस्त्यावर अपहरणाचा थरार
कारनं धडक दिल्यानं चिडलेल्या व्यक्तीनं महिलेचं तिच्याच कारमधून अपहरण केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या मैत्रिणीनं अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.
मुंबई: कारनं धडक दिल्यानं चिडलेल्या व्यक्तीनं महिलेचं तिच्याच कारमधून अपहरण केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या मैत्रिणीनं अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.
मंगळवारी या महिलेची मैत्रिण तिच्या घरी गेली होती, तेव्हा मैत्रिणीला सोडण्यासाठी तिनं आपली कार काढली. ही महिला स्वत: गाडी चालवत होती. काही किलोमिटर गेल्यानंतर गाडीनं एका व्यक्तीला धडक दिली.
धडक दिल्यानं ही व्यक्ती भडकली, आणि तो गाडीच्या मागच्या सिटवर जाऊन बसला. बंदुकीचा धाक दाखवून त्यानं गाडी डोंगरपाड्याला न्यायला सांगितली, असं महिलेच्या मैत्रिणीनं पोलिसांना सांगितलं.
गाडी डोंगरपाड्याच्या दिशेनं जात असताना लाईटच्या खांबावर आदळली आणि टायर पंक्चर झाला, तेव्हा त्या व्यक्तीनं आम्हाला गाडीतून खाली उतरायला सांगितलं. मग रिक्षा थांबवली आणि तिला घेऊन जबरदस्ती पसार झाला, असंही या महिलेनं पोलिसांना सांगितलं आहे.
आपल्याकडचे सगळे पैसे या व्यक्तीनं घेतले, तसंच अपहरण झालेल्या महिलेचा मोबाईल आता लागत नसल्याचा आरोप मैत्रिणीनं केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.