`झी 24 तास`च्या अनन्य सन्मान सोहळ्यात दुर्लक्षित रत्नांना गौरव, अनुराधा गोरेंना जीवन गौरव
समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांत अनन्य योगदान देणाऱ्या सात रत्नांचा मुंबईत दिमाखात झी 24 तास अनन्य सन्मानानं गौरव करण्यात आला. तर यंदाचा जीवन गौरव पुरस्कार हा वीरमाता अनुराधा गोरे यांना प्रदान करण्यात आला.
मुंबई : समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांत अनन्य योगदान देणाऱ्या सात रत्नांचा मुंबईत दिमाखात 'झी 24 तास'च्या अनन्य सन्मानाने गौरव करण्यात आला. तर यंदाचा जीवन गौरव पुरस्कार हा वीरमाता अनुराधा गोरे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची खास उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा, झी प्रादेशिक वाहिन्या सीईओ जगदीश चंद्रा आदी उपस्थित होते.
यावेळी एस्सेल समूहाचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या 'द Z फॅक्टर' यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे मोठ्या दिमाखात प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकाचं प्रकाशन एस्सेल समूहाचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दिग्गजांच्या हस्ते करण्यात आले.
अनन्य सन्मान गौरव व्यक्ती :
1. नरसिंग झेरे यांना सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील पाच ते सहा हजार लोकवस्तीचे गाव अनसरवाडा. डोंबारी समाज, अशी ओळख.
2. हेमलता तिवारी यांना मनोरंजन क्षेत्रात भरीवर कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबई लोकलमध्ये, प्लॅटफॉर्म, अन्य सार्वजनिक ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी सुरेल आवाजात गाणी गाणाऱ्या कलाकारांना कलाकार म्हणून प्रकाशझोतात आणण्याचं काम करत आहेत.
3. बाबुराव केंद्रे (नागदरवाडी, लोहा, नांदेड) यांना पर्यावरणात चांगली कामगिरी केल्याने त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी श्रमदानातून गावाला दुष्काळातून बाहेर काढले. 2000 पर्यंत येथे पाण्याचा दुष्काळ होता. त्यामुळे गावात मुलगी देण्यात कोणीही धजावत नव्हते. पाणी टंचाईमुळे बाबुराव केंद्रे यांचा साखरपुडा होऊन लग्न मोडले होते. यानंतर त्यांनी त्यांनी गावाला दुष्काळातून बाहेर काढले.
4. लक्ष्मीकांत खिची, औरंगाबाद - खेळ. मार्शल आ्रर्ट प्रशिक्षक. पन्नाशीतही रोजचा त्यांचा दिवस शिस्तबद्धपणे सुरु होतो. तरुण पिढीला खेळाचे महत्व पटवून देत आहेत. आत्मनिर्भरतेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, शाळा, कॉलेजमध्ये जाऊन खिची देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल झी 24 तासने घेतली.
5. मतीन भोसले, अमरावती - शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. उपेक्षीत फासेपारधी या समाजातील मुलांना शिक्षणाटे बाळकडू देण्याचे काम हे ध्येयवेडे शिक्षक करत आहेत. डिझिटल क्रांतीचे वारे वाहत असताना शिक्षणापासून वंचित तसेच दुलर्क्षित फासेपारधी समाज आहे. याच समाजातील ते. त्यांनी आपण जे भोगले ते पुढील पिढीच्या वाट्याला येऊ नये म्हणून शिक्षणाचे काम करत आहेत.
6. प्रमिला पाल (गृहीणी), विक्रोळी, मुंबईतील राहणाऱ्या. या सामान्य महिलेने असामान्य धैर्य दाखवले. जीवावर उदार होऊन त्यांनी मोठी दुर्घटना टाळली. त्यांच्या या शौर्य दाखविणाऱ्या कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले. 2 ऑक्टोबर 2016 रोजी गॅस संपल्याने प्रमिला स्वयंपाक घरात नवीन सिलिंडर लावत होत्या. मात्र, त्याचवेळी सिलिंडरमधून गॅस गळती सुरु झाली. पुढचा धोका ओळखून त्यांनी दोन्ही हातांनी गॅस रोखण्याचा प्रयत्न केला. गॅस नाका, तोंडात गेला पण त्यांनी हात बाजुला केले नाही. आरडाओरडा करत विद्युत प्रवाह बंद करण्यास सांगितले. शेजारी मदतीसाठी धावलेत. त्यानंतर अग्निशमनला कळविले. त्यांच्या या धाडसाची झी 24 तासने दखल घेतली.
7. राहीबाई पोपेरे, कोंभाळणे, अहमदनगर - शेतीत चांगले योगदान दिले. जिल्ह्यात कोंभाळणे या डोंगराळ आणि आदिवासी भागातील ही शेतकरी महिला. शेतीतील एक अमुल्य ठेवा जनत करण्याचं काम त्या करत आहेत. ज्या भाज्या लोकांना माहीत नाही आणि दुर्मिळ वनपस्पती यांचे जतन त्या करत आहेत.
अनुराधा गोरे यांना जीवनगौरव प्रदान
वीरमाता अनुराधा गोरे यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.1995 साली दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या कॅप्टन विनायक गोरे यांच्या त्या मातोश्री. त्यानंतर देशातल्या तरुणांना लष्करामध्ये जाऊन देशसेवा करण्यासाठी त्या प्रेरीत करत राहिल्या. त्यांच्या या कार्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित होते.
वीरमाते विषयी...
मुंबईतील विलेपार्ले भागात राहणाऱ्या अनुराधा गोरेंचे आयुष्य फिरत होते ते नवरा आणि मुलांभोवती. गोरे दाम्पत्याला दोन मुलं. एक मुलगा आणि एक मुलगी. मुंबईत शिक्षिका असलेल्या अनुराधा गोरेंनी आपल्या मुलांवर लहानपणापासूनच देशसेवा आणि नितीमुल्यांचे संस्कार केले. जेव्हा त्यांच्या मोठ्या मुलानं विनायकने लष्करात जाण्याचा निर्धार व्यक्त केला. तेव्हा अनुराधा गोरे आनंदीत झाल्यात. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर विनायक लष्करात कॅप्टन झाला तो क्षण गोरे कुटुंबासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा होता.
वीरमाता अऩुराधा गोरे आता फक्त शहीद विनायक गोरेंच्याच आई नाही तर देशासाठी लढणारे सगळेच सैनिक त्यांना आपली मुलं वाटतात. देशप्रेमाने भारलेल्या या मातेचा अनन्य सन्मान जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला.