बंगळुरू : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर अनिल कुंबळेने पहिल्यांदा आपलं मत व्यक्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेने म्हटलं आहे,  'खेळाडू आणि कर्णधार हेच आघाडीवर असतील आणि प्रशिक्षकांसह इतर सपोर्ट स्टाफ पडद्यामागे काम करेल'.


टीम इंडिया पुढील महिन्यात वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये संघाचे सराव सत्र सुरू आहे, यावेळी कुंबळे येथे आला होता.


सपोर्ट स्टाफ पडद्याआडूनच काम करतील


'संघाची सर्वोत्तम तयारी करून घेणे, हे माझे काम आहे. प्रशिक्षक किंवा इतर सपोर्ट स्टाफ पडद्याआडूनच काम करतील. मी स्वत:ही खेळाडू होतो, आता प्रशिक्षक झालो आहे. दोन्ही बाजूंच्या जबाबदारी मी व्यवस्थित जाणतो.' 


कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्याचे प्रयत्न....


कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील, ते सर्व करण्याची माझी तयारी आहे. येत्या वर्षभरात भारतीय संघ १७ कसोटी सामने खेळणार आहे. भारतासाठी कसोटी क्रिकेट किती महत्त्वाचे आहे, हे यावरून दिसते. 


मैदानावर कर्णधाराचाच शब्द अंतिम असेल....


'मी जेव्हा खेळत होतो, तेव्हा स्वत:च्या गोलंदाजीवर आपण स्वत:च कर्णधार असतो अशी माझी विचारसरणी होती. असेच विचार भारतीय गोलंदाजांमध्येही रुजविण्याचा माझा प्रयत्न असेल. सतत सल्ल्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते. खेळाडू आणि कर्णधार म्हणून माझ्या अनुभवाचा शक्‍य तितका फायदा खेळाडूंना होईल, हे पाहण्याचा माझा प्रयत्न असेल. पण मैदानावर मात्र कर्णधाराचाच शब्द अंतिम असेल. योजना आखणे आणि त्याची तयारी करणे यासाठी मदत करणे हे माझे काम असेल'.