कोलकाता : निवृत्तीच्या प्रश्नाला भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता चांगलाच वैतागलाय. आशिया कपच्या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत धोनीला पुन्हा एकदा निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नानंतर मात्र धोनी चांगलाच भडकला. एकच प्रश्न सतत विचारु नका. जर मी निवृत्तीबाबत महिन्या अथवा १५ दिवसांपूर्वी जे काही बोललो असेल त्यात काहीही बदल होणार नाहीये. माझे उत्तर तेच राहणार आहे. तुम्ही एकच प्रश्न फिरवून फिरवून का विचारताय. जसे माझे नाव कोणी विचारल्यास महेंद्रसिंग धोनी हे उत्तर साहजिकच आहे तितकेच निवृत्तीबाबतचे उत्तर साहजिक आहे, अशा शब्दात धोनीने पत्रकार परिषदेत उत्तर दिले.


 


गेल्या काही दिवसांपासून धोनीला त्याच्या निवृत्तीबाबत विचारले जातेय मात्र आपण इतक्यात निवृत्ती घेणार नसल्याचे धोनीने स्पष्ट केलेय. टी-२० आणि वनडेमध्ये आपल्याला आणखी खेळायचे असल्याचे तो म्हणाला. 


आशिया कपसाठी भारतीय संघ बांगलादेशला रवाना झालाय. २४ फेब्रुवारीला भारताचा पहिला सामना यजमान बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. आशिया कपनंतर लगेचच टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होतेय.