नवी दिल्ली : आज सकाळी भारतीय क्रीडा रसिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलीय. दीपा करमाकर ही जिम्नॅशियममध्ये ऑम्लिपिक स्पर्धेत पात्र ठरणारी पहिली भारतीय ठरलीय. आतापर्यंत एकाही भारतीय जिम्नॅस्टला ऑलिंपिक गाठता आलं नव्हतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूळची त्रिपुराची दीपा पहिल्यांदाच प्रकाश झोतात आलीय असं नाही. 2014मध्ये दीपानं ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला जिम्नॅस्टिकमध्ये पहिलं कांस्य पदक मिळवून दिलं. त्यानंतर 2015मध्ये जागतिक आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये ती पाचव्या स्थानावर होती आणि रविवारी रात्री उशिरा प्रोड्युनोव्हा प्रकारच्या उडीमध्ये तिनं जबरदस्त कामगिरी करून दाखलीय. 


शनिवारी झालेल्या क्लालिफायरमध्ये दीपानं 15.100 गुणांची कमाई केली. प्रोड्युनोव्हा जम्प ही जिम्नॅस्टिक्समधल्या काही अत्यंत कठीण जम्प्सपैकी एक समजली जाते. ही जम्प इतकी कठीण असते, की खेळाडूकडून जराशी चूक झाली, तर थेट पाठीचा कणा मोडण्याची भीती असेत. त्यामुळेच ही जम्प करण्याचं धाडस फारसे खेळाडू करत नाहीत. दीपानं रविवारी रात्री तिच्या सोबत स्पर्धेत असणाऱ्या यामलित पेना आणि फदवा मेहमूद या दोन्ही स्पर्धकांपेक्षा सरस कामगिरी करून तब्बल 15.100 गुणांची कमाई केली.  


यापैकी काठिण्य पातळीसाठी 7.000 आणि प्रत्यक्ष उडीसाठी 8.100 गुण देण्यात आले. त्यात तिला 0.1 गुणांची पेनल्टीही लावण्यात आली. पण जबरदस्त आत्मविश्वासाच्या जोरावर दीपानं हे अत्यंत दुर्मिळ असं लक्ष्य साध्य करून दाखवंलंय. दीपाचा सध्याचा फॉर्म बघता ती ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदकाची कमाई करेल अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही.