मुंबई : जगविख्यात समालोचक हर्षा भोगले यांचा एक वर्षाचा वनवास संपणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये हर्षा भोगले पुन्हा एकदा प्रेक्षकांना दिसणार आहेत. आयपीएलचं प्रसारण करणाऱ्या सोनीनं या बातमीला पुष्टी दिली आहे. हर्षा भोगलेंबरोबर लेखी कराराची औपचारिकता बाकी असल्याचं चॅनलचे बिजनेस हेड प्रसन्न क्रिष्णन यांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये मॅचच्या आधी आणि मॅचनंतर सोनीच्या एक्स्ट्रॉ इनिंग्स या कार्यक्रमात हर्षा भोगले दिसतील पण मॅचच्या कॉमेंट्रीमध्ये ते दिसतील का नाही याबाबत साशंकता आहे.


बीसीसीय आणि भारतीय खेळाडूंसोबत झालेल्या वादानंतर मागच्या वर्षी हर्षा भोगलेंची कॉमेंट्री बॉक्समधून गच्छंती झाली होती. मागच्या वर्षीच्या टी-20 वर्ल्ड कपवेळी अभिनेते अमिताभ बच्चन यांनी हर्षाचं नाव न घेता कॉमेंट्रीवर टीका केली होती. बिग बींचं हे ट्विट धोनीनं रिट्विट केलं होतं. विराट कोहली आणि मुरली विजय हेदेखील हर्षा भोगलेंनी विचारलेल्या प्रश्नावर नाराज झाल्याच्या चर्चा होत्या.


खेळाडूंची ही नाराजी लक्षात घेता टी-20 वर्ल्ड कपनंतर हर्षा भोगले कॉमेंट्री करताना दिसले नाहीत. पण आता लोढा समितीच्या शिफारसींनंतर बीसीसीआयमध्ये बदलेल्या अधिकाऱ्यांमुळे हर्षा भोगलेंचं कमबॅक होणार असल्याची चर्चा आहे.