नवी दिल्ली: 2014 सालची भारत आणि इंग्लंडमधली मॅन्चेस्टर टेस्ट फिक्स होती, असा खळबळजनक दावा तेव्हाचे टीम इंडियाचे मॅनेजर आणि आत्ताचे डीडीसीएचे सेक्रेटरी सुनिल देव यांनी केला आहे. हिंदी दैनिक सन स्टार यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सुनिल देव यांनी हा धक्कादायक दावा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसामुळे पिचची अवस्था पाहता टॉस जिंकलो तर बॉलिंग घ्यायचा निर्णय टीम मीटिंगमध्ये झाला, पण धोनीनं बॅटिंगचा निर्णय घेतला आणि आम्हाला धक्का दिला, असं देव या स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हंटले आहेत. धोनीच्या या निर्णयामुळे इंग्लंडचे माजी कॅप्टन जेफ्री बॉयकॉट यांनाही धक्का बसल्याचं देव म्हणाले आहेत. ही मॅच धोनीनं फिक्स केल्याचा आरोपच देव यांनी केला आहे.


हा मुद्दा आपण बीसीसीआयच्या लक्षात आणून दिला, तसंच तत्कालिन बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांना याबाबतच पत्रही लिहीलं, पण बीसीसीआयनं कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, असं ते या स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हणत आहेत.


या प्रकाराबद्दल आता का बोलताय, असं विचारलं असता मला जीवाचा धोका वाटत असल्याचं सुनिल देव म्हणाले आहेत. एवढच नाही, तुम्ही माझं स्टिंग ऑपरेशन करत असाल तर मी हे सगळे दावे नंतर फेटाळून लावीन, कारण मी अजूनही बीसीसीआयशी जोडला गेलेलो आहे, असंही सुनिल देव या स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हणाले आहेत.