रिओ : रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील शेवटच्या दिवशी 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीप्रकारात भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तचे आव्हान संपुष्टात आल्याने भारताला केवळ दोन पदकांवर समाधान मानावे लागलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वाधिक खेळाडूंचे पथक रिओ ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यात आले होते. मात्र भारताला संपूर्ण स्पर्धेत केवळ दोन पदके जिंकता आली. 


कुस्तीपटू साक्षी मलिकने कांस्यपदक मिळवत पदकांचे खाते खोलले. त्यानंतर बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने भारतासाठी रौप्यपदकाची कमाई केली. त्याव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय खेळाडूला पदक मिळवण्यात यश आले नाही.


भारताचा स्टार नेमबाज अभिनव बिंद्रा, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, धावपटू ललिता बाबर, गोल्फर अदिती अशोक, ऱोईंगपटू दत्तू भोकनळ यांनी अंतिम फेरीत धडक मारत पदकांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र पदक मिळवण्यात हे खेळाडू अपयशी ठरले.


लंडन ऑलिम्पिकच्या तुलनेत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या घटलीये. जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, पी.व्ही. सिंधू हिची ही पहिलीच ऑलिम्पिकवारी होती. मात्र या स्पर्धेत चांगली कामगिरी करत त्यांनी भारतीयांचे तसेच जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. दीपाचे पदक 0.15 गुणांसाठी हुकले मात्र तिने उपस्थितांची मने जरुर जिंकली. तसेच पुढील  ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धारही व्यक्त केला. 


पी.व्ही.सिंधू आणि साक्षी मलिक यांनी बॅडमिंटन आणि कुस्तीमध्ये नवा इतिहास रचला. सिंधू भारताला ऑलिम्पिक रौप्यपदक मिळवून देणारी पहिली महिला खेळाडू ठरली. तर महिला कुस्तीमध्ये साक्षीने भारताला पहिलवहिले पदक मिळवून नवा इतिहास रचला.