मुंबई : आगामी इंग्लंड विरुद्ध कसोटीसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. संघात इशांत शर्माने कमबॅक केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सिरीजसाठी टीम इंडियाची ही घोषणा करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत पार पडललेल्या बीसीसीआय निवड समितीच्या बैठकीत 15 सदस्यीय भारतीय टीमची घोषणा करण्यात आलीय. या टेस्ट टीममध्ये रोहित शर्माला स्थान मिळालेलं नाही. तर दिल्लीकर फास्ट बॉलर इशांत शर्मानं टेस्टमध्ये कमबॅक केलंय. चिकनगुनियामुळे इशांतला न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजला मुकावं लागलं होतं. या टेस्ट टीमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अष्टपैलू हार्दिक पंड्याला मिळालेलं स्थान. वनडे आणि टी-20 मधील कामगिरीच्या जोरावर पांड्याला टेस्टमध्ये संधी देण्यात आली आहे. 


टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 ने यश मिळवले होते. न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत दुखापतीमुळे सलामीवीर लोकेश राहुल आणि चिकनगुनियामुळे इशांत शर्मा यांना मुकावे लागले होते आणि त्यामुळे कोलकाता कसोटीत गौतम गंभीर आणि जयंत यादव यांना संघात स्थान देण्यात आले आहे. 


गौतम गंभीरला कोलकाता कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे इंदूर कसोटीत गंभीरला खेळण्याची संधी मिळाली. मात्र, यावेळी धवनला संघात स्थान देण्यात आले नसल्याने गौतम गंभीर आणि मुरली विजय आता डावाला सुरुवात करतील. याशिवाय ओपनर गौतम गंभीर, जयंत यादव, करुण नायरचाही समावेश करण्यात आलाय. 9 नोव्हेंबरपासून इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजला सुरुवात होत आहे.


टीम इंडियाचा कसोटी संघ


मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, आर अश्विन,  इशांत शर्मा, सिद्धीमान साहा, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, उमेश यादव, हार्दिक पांड्या, जयंत यादव, करुन नायर यांचा समावेश  आहे.